![]()
मराठवाड्याचे कुलदैवत असलेल्या लासूरगाव येथील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून (७ एप्रिल) उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार, बुधवार या दोन दिवसांत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सुमारे २० हजार भाविकांनी देवी दाक्षायणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यात्रेच्या पहिल्या, दुसऱ्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळच्या आरतीचा मान दर्शन रांगेतील सहा सपत्नीक भाविक दांपत्यांना मिळाला. तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य दर्शन रांगेतील भाविकांना आरतीचा मान मिळत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंद, उत्साह दिसून आला. वस्त्रालंकार पूजेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव दिंडीतील १५० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गत २० वर्षांपासून अखंडित सुरू आहे. वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांच्या हस्ते साड्या देण्यात आल्या. परंपरेनुसार तब्बल २५ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथून २०० भाविकांची पायी पालखीसह दिंडी सोमवारी सायंकाळी दक्षनगरीत दाखल झाली. मंदिर प्रशासनाने महिला, पुरुष भाविकांना सोयीसुविधा दिल्या. मंगळवारी दिंडीतील सर्व महिला भाविकांना देवीला अर्पण केलेल्या वाहिक साड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सहायक व्यवस्थापक संतोष शेलार, आदिनाथ वाघुडे, स्वयंसेवक उपस्थित होते. पीआयने घेतला आढावा ः वैजापूरचे पीआय सत्यजित ताईतवाले यांनी मंगळवारी सायंकाळी श्री देवी दाक्षायाणी मंदिरात दर्शन घेतले. मंदिरावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेतील भाविकांची गर्दी, सोयीसुविधांबाबत मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांच्याकडून आढावा घेतला. उद्यापासून ५० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येईल. यात्रेत स्वतः लक्ष देणार. रात्री पेट्रोलिंग करणार, असे पीआय ताईतवाले यांनी सांगितले.
Source link
लासूरगावला यात्रोत्सव; दोन दिवसांत 20000 भाविकांनी घेतले देवीचे दर्शन:जातेगाव दिंडीतील 150 महिलांना साड्यांचे वाटप