![]()
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी एका वयोवृद्ध व्यक्तीच्या खून आणि जबरी चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खून, दरोडा आणि जबरी चोरीचे एकूण पाच गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दामोदर जयराम मिंडे (वय ६२, रा. थोरांदळे पाईनमळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे त्यांच्या शेतातील घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लोखंडी पहाराने त्यांच्या डोक्यात वार करून खून केला. आरोपींनी सोन्याची अंगठी, रोख रक्कम आणि मोबाईल असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. मिंडे यांच्या मुलगी गीतल गावडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान, आरोपींनी पॅशन मोटारसायकलचा वापर करून खोडद-बेल्हे मार्गे पारनेरकडे पलायन केल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणेवाडी परिसरात सापळा रचून कबीर उंबऱ्या काळे (वय २४) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. कबीर काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासात आणखी चार गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास आरोपींकडे करत आहे.
Source link
वयोवृद्धाचा खून करून जबरी चोरी, दोन आरोपींना अटक:पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, 5 गंभीर गुन्हे उघडकीस