![]()
सत्ताधारी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते आमच्या पक्षात आले तर सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन, असे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे. महेश शिंदे यांच्या या विधानामुळे शिवसेना शरद पवार गटाच्या नेत्यांना फोडण्याच्या प्रयत्नांत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांत सध्या राजकीय पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा लागली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यापुढे शिवसेनेत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ते म्हणाले, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत मीच करेन. मी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपमध्ये येण्याचा सल्लाही दिला आहे. शशिकांत शिंदे शिवसेनेत आले पाहिजेत. ते तिकडे कशाला थांबलेत माहिती नाही. त्यांनी इथे यावे, असे ते म्हणालेत. प्रिया शिंदेंच्या कुणबी दाखल्याचा वाद न्यायप्रविष्ट साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व आमच्यात कोणतेही मतभेद नसून, आगामी काळात सर्वकाही व्यवस्थित होईल, असा दावाही महेश शिंदे यांनी यावेळी केला. तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या कुणबी प्रमाणपत्राचा वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर भाष्य करण्यासही नकार दिला. आमच्याकडून ओबीसी बांधवांवर कोणताही अन्याय झाला नाही. प्रतिस्पर्धी पक्षाने कुणबी उमेदवार दिल्यामुळे आम्हीही कुणबी उमेदवार दिला. प्रिया शिंदे यांच्या माहेरकडील वंशावळीमध्ये कुणबी हा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचा दाखला वैध आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे त्याची कुणीही मीडिया ट्रायल करू नये, असे ते म्हणाले. आमदार महेश शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. कुणबी दाखले देत असताना प्रत्येक कुटुंबाची वंशावळ पाहिली जाते, याची अधिकृत माहिती महसूल विभागाकडे आणि मोडी लिपीमध्ये पण असते. 1812 साली बाबाजी बर्गे यांची म्हणजेच जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांचे खापर पंजोबा यांची पहिली नोंद आहे. महेश शिंदे म्हणाले की, कुणबी म्हणजे शेती करणारा शेतकरी. याचे पूर्ण सातबारा उतारे आहेत. एवढं सर्व विषय क्लियर असताना अशा पद्धतीने मीडिया ट्रायल व्हायला नको होती. प्रिया शिंदे या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढल्या आहेत. ज्यामध्ये कोणीही निवडणूक लढवू शकतो. जर यामध्ये काहीही चुकीचं असतं तर जिल्हाधिकाऱ्यांनी ते बाद ठरवले असते. उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातील लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या सर्वच निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता पक्ष संघटनेचा विस्तार व पक्ष बळकटीला प्राधान्य देत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकार्यक्षम नेत्यांना घरी बसवण्याचा इशारा दिल्यामुळे शिवसेनेतील सर्वच नेते अंग झटकून पक्ष विस्ताराच्या कामाला लागलेत. या पार्श्वभूमीवर महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यापुढे शिवसेनेत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एकनाथ शिंदे व ठाकरेंच्या 8 खासदारांची गुप्त बैठक दुसरीकडे, एकनाथ शिंदे व ठाकरे गटाच्या 8 खासदारांची बुधवारी रात्री गुप्त बैठक पार पडल्याचे वृत्त फुटल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एकनाथ शिंदेंची गाडी अचानक ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात शिंदे व ठाकरे गटाच्या खासदारांची भेट झाली. ही बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती असा दावा केला जात आहे. या बैठकीला शिंदेंसोबत त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेही हजर होते, तर ठाकरे गटाकडून खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदारांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत शिंदेंनी या खासदारांना आपल्या पक्षात येण्याचे आवाहन केल्याची माहिती आहे. दरम्यान, ओमराजे निंबाळकर व अरविंद सावंत यांनी या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे.
Source link
शशिकांत शिंदेंना शिवसेनेत येण्याची ऑफर:शिंदे मूळचे शिवसैनिकच, ते आमच्यासोबत आल्यास सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन – महेश शिंदे