![]()
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे तब्बल 13 महिन्यांच्या कारावासानंतर अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, ज्यासाठी त्यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले. कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ आणि ओवाळणी करत खिंडकर यांचे जंगी स्वागत केले. तुरुंगातून बाहेर आल्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना खिंडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. आपल्याला एका जुन्या व्हिडिओच्या आधारे खोट्या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवण्यात आले असून, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. ही तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात सुटकेचा प्रस्ताव धनंजय देशमुखांसमोर ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोपही खिंडकर यांनी यावेळी केला. अनेक लोकांवर असे खोटे गुन्हे दाखल केले दादासाहेब खिंडकर म्हणाले, मला फसवण्यात आलेला हा जुना व्हिडिओ आहे. हे सगळे लोक पैसे घेतात, नशा करतात आणि खोटे गुन्हे दाखल करतात. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, ते प्रकरण दाबण्यासाठी या प्रकरणाचा वापर करण्यात आला. याच लोकांनी गावातल्या अनेक लोकांवर असे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याच आरोपींनी अनेक लोकांना मारहाण केली. परंतु, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घेण्याचा प्रस्ताव पुढे बोलताना दादासाहेब खिंडकर म्हणाले, आपल्यावर जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि तुरुंगात टाकण्यात आले. आपण तुरुंगात असताना आपल्यावर ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी धनंजय देशमुख यांना एक प्रस्ताव दिला. दादासाहेब खिंडकरला सोडवायचे असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घ्या असा प्रस्ताव धनंजय देशमुख यांना देण्यात आला होता. तसेच आपल्यावर ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यामागे मोठी राजकीय शक्ती असल्याचा दावाही दादासाहेब खिंडकर यांनी केला आहे. तसेच या सर्वांनी गावातील अनेक लोकांना मारहाण केली आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आपण पोलिसांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या आरोपींवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा दावाही खिंडकर यांनी केला आहे. देशमुख कुटुंबासोबत कायम असून हा लढा सुरूच असेल दरम्यान, आपण देशमुख कुटुंबासोबत कायम असून हा लढा सुरूच असेल, जीव गेला तरी यातून आपण माघार घेणार नसल्याचे दादासाहेब खिंडकर यांनी सांगितले आहे. तसेच खिंडकरचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, 1 मार्च रोजी माझा वाढदिवस होता. तुरुंगात असल्यामुळे मित्रांना तो साजरा करता आला नाही. त्यामुळेच त्यांनी जल्लोषात स्वागत केल्याचे त्यांनी सांगितले.
Source link
संतोष देशमुखांच्या हत्येची तक्रार मागे घ्या!:आरोपींचा धनंजय देशमुखांना प्रस्ताव, जेलमधून बाहेर आलेल्या दादासाहेब खिंडकरांचा दावा