![]()
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी युवा पिढीतील अमली पदार्थ आणि अल्कोहोलचे सेवन हे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान असल्याचे म्हटले आहे. ‘संयम’ या अमली पदार्थ विरोधी अभियानाच्या अहवाल प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अमली पदार्थांचा विपरीत परिणाम आरोग्य, कुटुंब आणि समाजावर होत असल्याने याविरोधात ठोस कारवाई महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनता चिंताजनक असून, केवळ झोपडपट्ट्यांमध्येच नव्हे तर उच्चभ्रू घरातील मुलेही व्यसनांना बळी पडत असल्याचे कुमार यांनी नमूद केले. शहरातील प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये ‘संयम’ अहवालाचे वाचन आणि जागृती व्हिडिओ प्रसारित करण्याचे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अमली पदार्थ विरोधी अभियान ‘संयम’ या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. अमली पदार्थ विरोधी अभियान केवळ पोलिसांनी राबवून उपयोग नाही, तर त्यात समाजाचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे, असे अमितेश कुमार म्हणाले. ‘संयम’ अहवालात नोंदवलेली निरीक्षणे उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाची ठरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पोर्शे अपघात प्रकरणात अमली पदार्थांचे दुष्परिणाम दिसून आले आणि व्यवस्थेतील अनेक त्रुटीही समोर आल्या. पोलिसांनी या प्रकरणात कडक कारवाई केल्याने दोषी मुलाचे वडील सुमारे दोन वर्षे कारागृहात बंदिस्त राहिले. युवा पिढीत मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाणही अधिक दिसून येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पोलिसांनी विविध कॉलेजमध्ये याबाबत जागृती सुरू केली आहे. कॉलेज व्यवस्थापन आणि पालक संघटनांनी मुलांच्या वर्तणुकीबाबत माहिती घेतली पाहिजे. आतापर्यंत अनेक चर्चा झाल्या असून, आता थेट कारवाई करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही अमली पदार्थांची मागणी आणि पुरवठा याबाबत आवाज उठवून पोलिसांना आवश्यक माहिती दिली पाहिजे. शाळा आणि कॉलेज परिसरात अमली पदार्थ विक्री होत असेल, तर त्याबाबत कारवाईसाठी दबाव निर्माण केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. शहराची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांकडे दहा हजार मनुष्यबळ असल्याने काही अडचणी आहेत, परंतु पोलीस कोणत्याही अमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी मागे हटणार नाहीत, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. यावेळी सहपोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त सागर कवडे, ताराचंद रामनाथ ट्रस्टचे प्रमुख नंदकिशोर राठी, ज्ञानप्रबोधिनीचे अजित कानिटकर, ज्ञान प्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिका संचालिका डॉ. अनघा लवळेकर आणि दर्शन मुंदडा उपस्थित होते. सात-आठ वर्षांत व्यसनाधिनता वाढली नंदकिशोर राठी म्हणाले, मागील सात ते आठ वर्षापासून समाजात व्यसनाधिनता वाढत असल्याचे दिसून येत आहे. बदलती जीवनशैली, भावनिक अस्थिरता, व्यसन आकर्षण , खोटी प्रतिष्ठा यामुळे व्यसनाधिनता वाढत आहे. ज्ञानप्रबोधिनी यांच्या मदतीने शहरातील दोन हजार जणांचे निरीक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे ही केवळ आकडेवारी नसून वास्तवतेचे प्रतीक आहे. आवश्यक त्या उपाययोजना यामाध्यमातून करण्यात येतील.
डॉ.अनघा लवळेकर यांनी सांगितले की, १३ ते २२ वयोगटातील मुलांच्या व्यसनाचा धोका याबाबत अभ्यास करण्यात आला. १३ ते १८ गटात गतीने व्यसन विळखा दिसून आला आहे. मुलींची व्यसन सुरवात कुतूहल मधून झाल्याचे दिसते. व्यसन सहज उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने सेवन देखील अधिक आहे. जसे वय वाढत जाते तसे व्यसन देखील वाढत असल्याचे दिसून आले. एनर्जी ड्रिंक सहज उपलब्ध पण त्यात वेगवेगळ्या रसायन मुळे व्यसन धोका वाढत आहे. तंबाखू ही पारंपरिक पद्धतीने व्यसन होताना दिसत नसली तरी हुक्का पार्लर, ई सिगरेट प्रमाण वाढत आहे. इंटरनेट व्यसन सर्व वयोगटात वाढले आहे. मुलांच्या अवतीभोवती असलेल्या व्यक्ती यांचा परिणामुळे व्यसन वाईट नाही असा मुलांचा समज होतो आहे. व्यसनाच्या मोहाला मुले बळी पडत असून त्याशिवाय पर्याय नाही अशी त्यांची मानसिकता झाली आहे. व्यसन अभ्यास महत्वाचा त्याप्रमाणे दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहे.सातत्याने समुपदेशन मुलांना जागरूकताबाबत महत्वाचे आहे.
Source link
'संयम' अहवाल प्रकाशित:युवा व्यसनाधीनता गंभीर आव्हान; पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली चिंता