![]()
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाने ‘समता सप्ताह’ सुरू केला आहे. हा सप्ताह १४ एप्रिलपर्यंत चालणार असून, या अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्ये, कार्यशाळा, मेळावे आणि व्याख्यानांचा समावेश आहे. शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच सामाजिक समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना प्रोत्साहन देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी सांगितले की, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित स्पर्धा घेतल्या जात आहेत. तसेच, संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगणारी व्याख्याने आणि वक्तृत्व स्पर्धा जिल्हा व विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आल्या आहेत. १० एप्रिल रोजी समतादूतांद्वारे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये पथनाट्ये व लघुनाटिकांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी प्रबोधन केले जाईल. याच दिवशी मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाईल, ज्यात त्यांच्या सामाजिक कार्यावर व्याख्यान आयोजित केले आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे, शाळा, वसतिगृहे व महाविद्यालयांमध्ये आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरे घेतली जातील. १२ एप्रिल रोजी ‘संविधान जागर’ कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यावर माहिती दिली जाईल. महिलांसाठी विशेष मेळावे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे व मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. १३ एप्रिल रोजी जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन असून, शासकीय कार्यालये आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याच दिवशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित केली जातील. सप्ताहाचा समारोप १४ एप्रिल रोजी होईल. या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम, विविध व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विभागाने कळविले आहे.
Source link
समाज कल्याण विभागाच्या समता सप्ताहाला प्रारंभ:14 एप्रिलपर्यंत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन