Headlines

काँग्रेसचे दर्यापूर तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांचा राजीनामा:खासदार वानखडे आणि जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त




दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अलिकडेच झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीपासूनच दर्यापूर काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी सुरू होत्या. भारसाकळे यांनी खासदार बळवंत वानखडे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. यापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. भारसाकळे यांच्या म्हणण्यानुसार, दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारांची तिकिटे ऐनवेळी जिल्हाध्यक्ष आणि खासदार यांनी नाकारली होती. तसेच, नगरसेवक आणि त्यांच्यात वाद निर्माण करण्याचे कामही या नेत्यांकडून करण्यात आले. नुकत्याच दर्यापूरमध्ये अल्पसंख्यांक सेलच्या नियुक्त्या करण्यात आल्या, ज्याबद्दल त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. काँग्रेस सोडून गेलेले स्थानिक ज्येष्ठ नेते बाळासाहेब हिंगणीकर आणि त्यांच्यातही या मंडळींनी वाद निर्माण केल्याचा आरोप भारसाकळे यांनी केला. त्यांनी सांगितले की, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले असून, आज संपूर्ण जिल्ह्यात केवळ दर्यापूरमध्येच काँग्रेस भक्कम स्थितीत आहे. मात्र, या मोठ्या नेत्यांमुळे त्यांची घुसमट होत असल्याने त्यांनी राजीनामा दिला. आता भारसाकळे कोणत्या पक्षात प्रवेश करतात, याकडे दर्यापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. दर्यापूर तालुक्यातील बहुतेक संस्था काँग्रेसच्या ताब्यात आहेत. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ, काही ग्रामपंचायती आणि सेवा सहकारी सोसायट्यांचा समावेश आहे. भारसाकळे यांच्या पत्नी येथील नगराध्यक्ष आहेत, तसेच जिल्ह्याचे खासदार बळवंतराव वानखडे यांचा हा गृहतालुका आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात काँग्रेसचे मोठे वर्चस्व आहे. तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे येत्या काळात राजकीय चित्र कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *