Headlines

भाजप सुप्रिया सुळेंच्या व्याहींवर डाव टाकणार?:विधान परिषदेच्या वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली मतदारसंघातून अरुण लाखानींचे नाव चर्चेत




विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागलेत. त्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील वर्धा – चंद्रपूर – गडचिरोलीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लाखाणी यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. या माध्यमातून महायुतीने महाविकास आघाडीच्या मतांना भगदाड पाडण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे. अरुण लाखाणी हे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. सुप्रिया यांच्या कन्या रेवती यांचे लग्न अरुण लाखाणी यांचे सुपुत्र सारंग लाखाणी यांच्याशी विवाह ठरला आहे. अरुण लाखाणी हे भाजपचे सह-कोषाध्यक्ष आहेत. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे राज्यात या दोन्ही राजकारणी कुटुंबातील विवाहसंबंधाची खमंग चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अरुण लाखाणी यांना विधान परिषदेच्या वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची चर्चा सुरू झाली आहे. अरुण लाखाणींचे तिन्ही जिल्ह्यांत कार्यक्षेत्र भाजपने विधान परिषदेच्या विदर्भातील जागा स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या जागेवर अरुण लाखाणी यांना उमेदवारी देईल असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे गत निवडणुकीतही या मतदारसंघातून अरुण लाखाणी यांच्या नावाची चर्चा झाली होती. पण त्यांना त्यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांचे नाव या मतदारसंघातून चर्चेत आले आहे. यावेळी त्यांचे वैवाहिक संबंध राज्यातील एका बड्या राजकीय घराण्याशी जुळल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त असल्याचे मानले जात आहे. कोण आहेत अरुण लाखाणी? अरुण लाखाणी हे विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी नागपूर येथील 24 बाय 7 जलवितरण प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासारख्या विदर्भातील मोठ्या विकास प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे. लाखाणी हे लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून गडचिरोली व विदर्भातील दुर्गम आदिवासी भागांत 500 हून अधिक एकल शिक्षक शाळा चालवतात. त्यांनी रुणाधार ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या कौशल्य विकासासाठीही मोठे काम केले आहे. या सामाजिक कार्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचा थेट संपर्क आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *