Headlines

आर. माधवनच्या संघर्षाची कहाणी:सैनिक बनू शकला नाही, शस्त्रक्रियेमुळे 3 वर्षे करिअर थांबले; आज पॅन-इंडिया स्टार




हिंदी आणि तमिळ चित्रपटसृष्टीत आर. माधवन आज केवळ एक प्रस्थापित अभिनेताच नाहीत, तर एक प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकही आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २५ मे रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करतील. चला, त्यांच्या संघर्षातून यशापर्यंतच्या प्रवासाची कहाणी जाणून घेऊया… जमशेदपूरमध्ये १ जून १९७० रोजी एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात जन्मलेल्या आर. माधवन यांचे जीवन आर्थिक आणि शारीरिक संघर्ष तसेच करिअरमधील आव्हानांनी भरलेले होते. माधवन कॉलेजच्या दिवसांमध्ये सर्वोत्तम एनसीसी कॅडेट होते. सैन्यात अधिकारी बनणे हे त्यांचे स्वप्न होते, परंतु वयोमर्यादेच्या नियमांमुळे त्यांना परीक्षेत अपात्र ठरवण्यात आले. संघर्ष – उदरनिर्वाहासाठी कोचिंग दिले, चित्रपटांमध्ये नकार पचवले १९९३ मध्ये माधवन मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते पब्लिक स्पीकिंगचे कोचिंग देऊन आणि छोटी-मोठी मॉडेलिंग करून गुजारा करत होते. तमिळ चित्रपट “इरुवर” साठीच्या स्क्रीन टेस्टमध्ये मणिरत्नम यांनी त्यांना नाकारले. त्यांच्या चॉकलेटी प्रतिमेमुळे त्यांना गंभीर भूमिकांसाठी अनेकदा नकार पचवावे लागले. माधवन करिअरच्या शिखरावर असताना, ‘थ्री इडियट्स’च्या शूटिंगदरम्यान त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून ते तमिळ चित्रपटाचे शूटिंग करू लागले आणि पुन्हा त्याच गुडघ्याला इतकी गंभीर दुखापत झाली की त्यांना ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ होता. ३ वर्षे ते चित्रपटांपासून दूर राहिले. त्यानंतर “रॉकेट्री’च्या शूटिंगदरम्यान कोरोना आला. माधवन सांगतात की, तेव्हा चार वर्षे त्यांना काहीच कमाई झाली नाही. यश – तमिळ सिनेमातून चमकले, ‘रहना है’मुळे बनले स्टार माधवन त्या मोजक्या अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी इंग्रजी, हिंदी आणि दक्षिण भारतीय भाषांमध्ये ७० हून अधिक चित्रपट केले आहेत. सर्वात आधी १९९७ मध्ये माधवन यांनी इंग्रजी चित्रपट “इन्फर्नो’मध्ये एक छोटी भूमिका साकारली. त्याआधी ते टीव्ही जाहिराती आणि मालिकांमध्ये काम करत होते. १९९८ मध्ये “शांती, शांती, शांती’ या चित्रपटातून त्यांनी कन्नडमध्ये पदार्पण केले. २००० मध्ये तमिळ ब्लॉकबस्टर “अलाईपायुथे’ हा त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. यामुळे ओळख मिळाली आणि माधवनने “रहना है तेरे दिल में’ मधून धमाकेदार बॉलिवूड पदार्पण केले. 2006 ते 2015 दरम्यान माधवनने रंग दे बसंती, थ्री इडियट्स, तनु वेड्स मनु या चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. “रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ मधून ते निर्माताही बनले. माधवनला आयफा, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड व्यतिरिक्त अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *