![]()
वेरूळ व परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या काळ्या ढगांसह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली आणि पाठोपाठ सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे संपूर्ण वेरूळ परिसर जलमय झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक पर्यटकांनी लेणीच्या व्हरांड्यात व सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. गारपिटीमुळे लेणी परिसरातील वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या. शेतीचे नुकसान होण्याची भीती ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. परिसरात काढणीला आलेली व गहू पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फळबागांनाही गारपिटीचा फटका बसला आहे. “ढगांच्या गडगडाटासह मोठ्या आकाराच्या गारा पडल्या. डाळिंब व मोसंबीच्या बागांचे नुकसान झाले,” असे एका स्थानिक शेतकऱ्याने सांगितले. वीज पुरवठा खंडित विजांच्या कडकडाटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. हवामान खात्याने पुढील २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी व पर्यटकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे व झाडाखाली आसरा घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांसमोर मात्र नवे संकट उभे राहिले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Source link
अवकाळी पावसाने वेरूळला झोडपले!:अर्धा तास चाललेल्या पावसामुळे लेणी परिसर जलमय, पर्यटकांची तारांबळ; बळीराजा पुन्हा चिंतेत