Headlines

शेंदुरजनाघाटमध्ये अधिक मासानिमित्त 'श्री दत्त दिंडी'चा गजर:तीन वर्षांनी आलेल्या ज्येष्ठ अधिकमासात भक्तीमय वातावरण




शेंदुरजनाघाट शहरात तीन वर्षांनी आलेल्या ज्येष्ठ अधिक मासानिमित्त ‘श्री दत्त दिंडी’चा गजर सुरू झाला आहे. १७ मे रोजी सुरू झालेली ही दिंडी १५ जूनपर्यंत महिनाभर चालणार असून, पहाटेच्या भक्तीमय वातावरणाने संपूर्ण नगरी दुमदुमून गेली आहे. हिंदू पंचांगानुसार, दर तीन वर्षांनी ज्येष्ठ अधिकमास येतो, ज्यामुळे यावर्षी हिंदू नववर्ष १३ महिन्यांचे झाले आहे. या काळात लग्नकार्यासारखी सर्व मांगलिक कार्ये वर्ज्य मानली जातात. मात्र, पूजापाठ, जप-तप आणि दान पुण्य केल्यास भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पहाटेच्या मंगल समयी वीणा, टाळ आणि मृदंगाच्या सुश्राव्य गजराने शहरातील वातावरण पूर्णपणे भक्तीमय झाले आहे. दिंडी मार्गावर नागरिक आपल्या अंगणात पाणी टाकून, सुबक रांगोळ्या काढून आणि दिंडीची पूजा-अर्चा करून अत्यंत उत्साहात स्वागत करत आहेत. पूर्वी या दिंडीमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ मंडळींचा सहभाग असे, ज्यामुळे ही वारकरी परंपरा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, शेंदुरजनाघाटमध्ये याउलट चित्र दिसत आहे. वडीलधाऱ्यांसोबतच तरुण वर्ग आणि चिमुकल्यांचाही सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. नव्या पिढीच्या या उत्साहामुळे दिंडीला आता विशाल स्वरूप प्राप्त झाले आहे. दररोज पहाटे ठीक ५ वाजता आदर्श चौकातील श्री दत्त मंदिरातून दिंडीला सुरुवात होते. प्रमुख मार्गांवरून फिरून सकाळी ७ वाजता दिंडी पुन्हा दत्त मंदिरात पोहोचते, जिथे आरती होऊन सांगता होते. महिनाभर चालणाऱ्या या भक्तीच्या महोत्सवामुळे शेंदुरजनाघाट परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *