![]()
अनिल कदम यांचा व्यवसाय सर्वाधिक खडतर कष्टांची मागणी करणारा अर्थात शेतीचा होता. त्यामुळे नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांना थकवा जाणवायला लागला तेव्हा हे कामामुळेच होत असणार असाच त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांचा समज झाला. ही लक्षणे बळावल्यावर, त्यांना उलट्या सुरू झाल्यावर तसंच गिळताना त्रास होऊ लागल्यावर मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि नाशिकच्या या ५५ वर्षीय शेतकऱ्याच्या साध्या थकव्याच्या तक्रारीतून सुरू झालेलं हे प्रकरण एका दुर्मिळ आणि जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कर्करोगाच्या निदानापर्यंत पोहोचले. या आजारातून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दीपक छाब्रा यांच्या नेतृत्वाखाली पोटाच्या काही सर्वाधिक जटिल शस्त्रक्रियांमध्ये गणली जाणारी शस्त्रक्रिया पार पाडावी लागली. अनिल यांची नेहमीची रक्ततपासणी करण्यात आली व त्यातून त्यांची हिमोग्लोबीनची पातळी भयंकर खाली म्हणजे ३.५ g/dL पर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. यातून त्यांना तीव्र अनिमिया असल्याचे सिद्ध झाल्याने तातडीने रक्त चढविण्यात आले. अधिकच्या तपासणीमधून शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याचे उघड झाले. एंडोस्कोपीमधून अल्सरयुक्त वाढीचे निदान झाले व बायोप्सीमधून हा एक गॅस्ट्रोइंटेस्टिनल स्ट्रोमल ट्यूमर (जीआयएसटी), नावाचा पचनमार्गाचा एक दुर्मिळ कॅन्सर असल्याचे निश्चित झाले. आजाराची संपूर्ण व्याप्ती मात्र प्रगत इमेजिंगनंतरच स्पष्ट झाली. एका कॉन्ट्रास्ट-एनहान्स्ड सीटी स्कॅनमधून १४ सेंमी आकाराचा एक प्रचंड मोठा ट्यूमर जेज्युनमधून म्हणजे लहान आतड्याच्या मधल्या भागातून उगम पावत असल्याचे दिसून आले. जीआयएसटी इथे सहसा तयार होताना दिसत नाही. ट्यूमरने उदर, पॅन्क्रियाज (स्वादुपिंड), स्प्लीन (प्लीहा) आणि लहान व मोठे आतडे या दोहोंच्याची काही भागात आधीच शिरकाव केलेला होता. या स्कॅनमधून इंटर्नल नेक्रॉसिसने (अंतर्गत उतींचा नाश) ग्रस्त असे काही भागही दिसून आले, ज्यांच्यामुळे रक्तस्त्रावाचा धोका लक्षणीयरित्या वाढलेला होता. ट्यूमर असा मोठ्या प्रमाणात पसरलेला असूनही अनिल यांना केवळ अशक्तपणा जाणवत होता. पोटातील कॅन्सर्स प्रगत टप्प्यांवर पोहोचपर्यंत किती घातकरित्या छुप्या स्थितीत राहतात, हे यातून ठळकपणे दिसून आले. आपल्या वडिलांच्या निदानाविषयी बोलताना त्यांच्या कन्या भक्ती म्हणाल्या, “आम्ही लिलावती हॉस्पिटलमध्ये आलो, व इथल्या डॉक्टरांनी आम्हाला हा गॅस्ट्रोइंटेन्सिटनल स्ट्रोमल ट्यूमर (जीआयएसटी) असल्याचे जवळजवळ खात्रीपूर्वक सांगितले. माझ्या वडिलांवर यापूर्वी १९९६ मध्ये पोटाची शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे सुरुवातीला आम्ही हे प्रकरण कितपत गंभीर आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. फेब्रुवारी महिन्यात आम्ही नाशिकला परतलो आणि त्यांनी ट्यूमरचा आकार कमी व्हावा यासाठीची औषधे सुरू केली. या काळात, त्यांना वरचेवर अस्वस्थ वाटायचे. त्याचं मन जरा दुसऱ्या गोष्टींत रमावे म्हणून एक दिवस आम्ही त्यांना शेतात थोडं चालण्यासाठी घेऊन गेलो, पण अचानक ते प्रचंड घामाघूम झाले. आम्ही त्यांना घरी आणलं, तर ते कोसळले, त्यांचे हात पांढरे पडले होते आणि त्यांच्या शौचातून रक्त जाऊ लागले होते.” “GIST खूप मोठ्या आकाराचा असल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होते आणि मुख्यत: सततच्या रक्तस्त्रावामुळे तो घातक बनला होता. आजुबाजूच्या अवयवांमध्येही तो पसरला होता आणि प्लीहा व पोटाच्या इतर भागांवर त्याचा परिणाम होत होता, ज्यामुळे शस्त्रक्रिया करणं प्रचंड आव्हानात्मक झाले होते.” त्या पुढे म्हणाल्या. अनिल यांना इमॅटिनिब (Imatinib) हे औषध सुरू करण्यात आले, जी जीआयएसटीसाठी वापरण्यात येणारी एक टार्गेटेड थेरपी आहे. मात्र, पहिल्या डोसनंतर लगेचच त्यांना प्रचंड अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाला. यामुळे हिमोग्लोबीनची पातळी अधिकच खाली गेल्याने तातडीने रक्त चढवावे लागले व त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या टप्प्यावर फक्त वैद्यकीय थेरपी पुरेशी ठरणे शक्य नव्हते. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दीपक छाब्रा यांनी लिलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उच्च जोखमीची, क्युरेटिव्ह सर्जरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ट्यूमरचा आकार आणि त्यात अनेक अवयवयांचा समावेश असणे लक्षात घेता, या प्रक्रियेसाठी असाधारण दर्जाची अचूकता आणि नियोजन गरजेचे होते. टीमने मल्टीव्हिसेलर रिसेक्शन पार पाडले, ज्यात उदराचा भाग, स्वादुपिंडाचे टोक व प्लीहा तसेच लहान व मोठ्या आकड्याचे काही भाग यांच्यासकट ट्यूमर काढून टाकण्यात आला. ट्यूमर पसरण्यापासून रोखण्यासाठी व ऑन्कोलॉजिक सुरक्षेसाठी सर्व प्रभावित अवयव एका सलग भागाच्या रूपात काढून टाकण्यात आले. या प्रक्रियेविषयी बोलताना लिलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ. दीपक छाब्रा म्हणाले, “ट्यूमर काढून टाकल्यानंतर, पुनर्बांधणीची एक गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली, ज्यात Roux-en-Y पुनर्बांधणी व आतड्यांची पुनर्जोडणी यांचा सहभाग होता. यातून पचनमार्गाची सलगता पूर्ववत करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी प्रगत तांत्रिक कुशलतेची गरज होतीच पण विशेषत: आधीच नऊ युनिट्स रक्ताची गरज भासलेल्या या रुग्णाच्या बाबतीत शस्त्रक्रियेच्या आधी, दरम्यान आणि नंतर काळजीपूर्वक केल्या जाणाऱ्या आनुषंगिक कामांच्या व्यवस्थापनाचीही गरज होती. ही केस विशेषत्वाने आगळीवेगळी असल्याची नोंद आम्ही घेतली, कारण यात अशक्तपणा हे एकच लक्षण दिसत होते, ट्यूमरचा आकार १४ सेंमी, म्हणजे असाधारणपणे मोठा होता जो जेज्युनमसारख्या अत्यंत दुर्मिळ जागी तयार झाला होता, यात अनेक अवयवांचा समावेश होता आणि टार्गेटेड थेरपी सुरू केल्यानंतर तीव्र रक्तस्त्राव सुरू झाला होता. अशी सर्व आव्हाने असूनही एकाच टप्पातील क्युरेटिव्ह शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.” “हॉस्पिटलच्या प्रगत पायाभूत सोयीसुविधांमुळे हा परिणाम साध्य करणे शक्य झाले. यात हाय-रेझोल्युशन इमेजिंग, स्पेशलाइज्ड निदानात्मक तपासण्या, एक संपूर्णतया सुसज्ज अशी रक्तपेढी आणि अतिदक्षता विभागाचे पाठबळ व सुसंयोजित मल्टिडिसिप्लिनरी देखभाल यांचा सहभाग होता.” डॉ. दीपक छाब्रा पुढे म्हणाले. अकारण जाणवणारा सततचा अशक्तपणा किंवा तीव्र अनिमिया या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण ती अंतर्गत रक्तस्त्रावाची किंवा छुप्या कर्करोगाची प्रारंभिक चिन्हे असू शकतात हे अनिल यांच्या प्रकरणातून ठळकपणे दिसून येते. लवकर झालेले निदान आणि वेळच्यावेळी केलेला वैद्यकीय हस्तक्षेप या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. साध्या थकव्याच्या तक्रारीपासून सुरू झालेले हे दुखणे जटिल कॅन्सरसंबधी आणीबाणीपर्यंत पोहोचले, पण शस्त्रक्रियेच्या निर्णयाबाबत खंबीरपणे केलेले नेतृत्व आणि सर्वसमावेशक देखभाल यांच्या माध्यमातून आम्हाला एक प्राणरक्षक परिणाम मिळविणे शक्य झाले. कर्करोगावरचे आधुनिक उपचार व त्यांना तज्ज्ञांचे व पायाभूत सोयिसुविधांचे मिळालेले पाठबळ यांच्या मदतीने अगदी सर्वाधिक आव्हानात्मक स्थितीही कशाप्रकारे हाताळता येते हे या प्रकरणातून ठळकपणे दिसून येते. रुग्णाची तब्येत पूर्ववत होत असली तरीही डॉक्टरांकडून कधी एकदा पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी मिळते व कधी एकदा आपण आपल्या प्रिय जमिनीकडे परततो, शेताची मशागत करतो आणि मातीशी नव्याने नाते जोडतो याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. अंतर्गत अवयवांच्या अनेक पुनर्जोडण्यांचा समावेश असलेली इतकी मोठी शस्त्रक्रिया होऊनही रुग्णाची तब्येत सुरळीतपणे पूर्ववत होत आहे. शस्त्रक्रियेनंतर नवव्या दिवशी त्यांना घरी पाठवण्यात आले ही गोष्ट स्वत: एक आयुर्वेदिक डॉक्टर असलेली त्यांची कन्या भक्ती यांनी सांगितल्याप्रमाणे, शस्त्रक्रियेच्या वाखाणण्याजोग्या कौशल्यांविषयी खूप काही सांगून जाते.
Source link
साध्या थकव्याचे रूपांतर दुर्मिळ कॅन्सरमध्ये:नाशिकच्या 55 वर्षीय शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज यशस्वी; 14 सेंमी आकाराचा आढळून आला ट्यूमर