![]()
अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवार, २५ मे पासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला तरी, विविध पक्षांतर्फे एकूण १६ अर्जांची उचल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल भवनात स्वतंत्र निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल काळे यांनी माजी मंत्री प्रवीण पोटे आणि अनुराधा पोटे यांच्यासाठी ५ अर्ज घेतले. डॉ. ओमप्रकाश झोड यांनी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्यासाठी ३, तर ओम मेटकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासाठी ३ अर्ज उचलले. याशिवाय, योगेश गावंडे यांनी स्वत:साठी २, तर संदीप मेश्राम, विनीत डोंगरदिवे आणि मोहम्मद सिद्दीक मो. सादीक यांनी प्रत्येकी एक अर्ज उचलला. अशा प्रकारे एकूण ८ जणांसाठी १६ अर्जांची उचल झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून आहे. प्राप्त सर्व अर्जांची छाननी मंगळवार, २ जून रोजी केली जाईल आणि त्याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून असून, १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होईल. उन्हाची तीव्रता आणि वातावरणातील बदलांमुळे यावेळी केवळ जिल्हा मुख्यालयी मतदान न घेता, एसडीओ स्तरावरही मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण सात ठिकाणी मतदान घेतले जाईल. या निवडणुकीत मतदान ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे केले जाते. उमेदवारांच्या नावापुढे शिक्का किंवा खूण न करता पसंतीक्रम नोंदवावा लागतो, त्यामुळे ही निवडणूक एकलसंक्रमण पद्धतीची मानली जाते. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे सदस्य असे एकूण ४५३ लोकप्रतिनिधी या निवडणुकीचे मतदार आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीच्या सभापतींनाही मतदानाचा अधिकार असतो, परंतु सध्या त्या सर्व जागा रिक्त आहेत.
Source link
विधान परिषद निवडणूक सुरू, पहिल्या दिवशी १६ नामांकनांची उचल:पोटे, देशमुख, जगताप यांच्या नावांचा समावेश