![]()
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘मिहान इंडिया लिमिटेड’कडून ‘जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’ला हस्तांतरण करण्यात आले आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून या विमानतळाचा विकास केला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी विमानचालन मंत्री किंजरापू राममोहन नायडू आणि जीएमआर समूहाला स्पष्ट निर्देश दिले. विमानतळ विकासाचे काम २०२९ पर्यंत, म्हणजेच राज्य सरकारच्या सध्याच्या कार्यकाळातच पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विमानतळाचा विकास २०३० पर्यंत करण्याचा प्रस्ताव असला तरी, ते मान्य नाही. प्रत्येक सरकारचा कालावधी पाच वर्षांचा असतो आणि त्यांच्या सध्याच्या कार्यकाळातच हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. २०२९ नंतरही त्यांचेच सरकार येणार असले तरी, नवीन अवतारात नवीन कामे केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. व्हिडिओमध्ये दाखवलेली कामे प्रत्यक्षातही तशीच दिसली पाहिजेत, कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड चालणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी विमानचालन मंत्री किंजरापू राममोहन नायडू, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि जीएमआर समूहाचे अध्यक्ष जी. एम. राव यांच्यासह अनेक आमदार, खासदार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमानचालन मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी नागपूरमध्ये एमआरओ हब (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल) होण्याची पूर्ण क्षमता असल्याचे सांगितले. दिलेल्या वेळेत विमानतळाचा विकास केला जाईल आणि विमानतळाच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग केला जाईल, अशी हमी त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, जीएमआर समूह विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी ७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यात नवीन टर्मिनल आणि दुसरी धावपट्टी निर्माण केली जाईल. त्यांनी नागपूरहून सिंगापूर आणि दुबईसाठी तत्काळ ‘कनेक्टिंग फ्लाईट्स’ सुरू करण्याची मागणी केली. गडकरींनी नागपुरी संत्रा आणि स्थानिक कृषी उत्पादने थेट विदेशात पोहोचवण्यासाठी आधुनिक कार्गो सुविधा उभारण्यावर भर दिला. प्रकल्पाच्या गतीसाठी प्रशासनाला ताकीद देत, विमानतळाशी संबंधित कोणतीही फाईल आठ दिवसांच्या आत क्लिअर झाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
Source link
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय मंत्र्यांना तंबी:नागपूर विमानतळ विकास 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश