Headlines

साईनगरीचे आरोग्य जपण्यासाठी प्रशासनाची नालेसफाई:गटारसफाई अन् फॉगिंग मोहीम, शिर्डीला अव्वल ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी- आरोग्य सभापती गोंदकर‎




देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी शहरात पावसाळा सुरू होताच स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते, नाले आणि गटारी तुंबून नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच डासजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी शिर्डी नगर परिषदेने आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरभर नालेसफाई, गटारसफाई आणि औषध फवारणीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छ शहरांच्या राष्ट्रीय क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवण्याच्या उद्देशाने प्रशासनाने कंबर कसली असून नागरिकांनीही स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिर्डी नगर परिषदेचे आरोग्य सभापती दीपक गोंदकर यांनी केले आहे. शिर्डीने यापूर्वी स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार आणि परितोषिके पटकावली आहेत. ती यशाची परंपरा कायम राखण्यासाठी आणि शहराची स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी प्रतिमा अधिक भक्कम करण्यासाठी नगर परिषद प्रशासन पूर्णपणे सक्रिय झाले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील स्वच्छतेच्या कामांना गती देण्यात आली आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिष दिघे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे आरोग्य सभापती गोंदकर यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख नाले, गटारी आणि पाणी वाहून नेणाऱ्या मार्गांची साफसफाई करण्यात आली असून ज्या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, अशा सखल भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने फॉगिंग मशीनद्वारे शहरभर जंतूनाशक औषध फवारणीची मोहीमही सुरू केली आहे. शिर्डी नगर परिषदेचे महत्त्वाचे पाऊल पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख नाले, गटारी आणि पाणी वाहून नेणाऱ्या मार्गांची साफसफाई पूर्ण, पावसानंतर डास आणि कीटकांची उत्पत्ती रोखण्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे शहरभर औषध फवारणी सुरू, ज्या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, तिथे पाणी उपसा करण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी विशेष लक्ष, स्वच्छ शहरांच्या राष्ट्रीय क्रमवारीत पुन्हा एकदा शिर्डीचा अव्वल नंबर आणण्याचा प्रशासनाने निर्धार केला आहे. प्रशासन आणि नागरिकांनी पुढाकार घेणे काळाची गरज श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येत असतात. त्यामुळे शहराची स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण जपणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सभापती गोंदकर यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, थुंकू नये तसेच स्वच्छता नियमांचे पालन करून नगर परिषदेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा झेंडा रोवायचा असेल तर प्रशासन आणि नागरिक या दोघांनीही पुढाकार घेणे काळाची गरज बनली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *