Headlines

सेवापूर्ती सोहळ्यात 5 एकल मुलांचे स्वीकारले पालकत्व




डॉ. संजय कळमकर हे कथा, कादंबरी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते जरी आज गटशिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त होत असले, तरी त्यांनी आता शासकीय सेवेतून निवृत्त होऊन माझ्यासोबत पूर्णवेळ काम केले पाहिजे. त्यांच्यासारख्या प्रगल्भ लोकांची आज समाजाला मोठी गरज आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. डॉ. कळमकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. तर व्यासपीठावर तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षक नेते संभाजी थोरात, आबासाहेब जगताप, रावसाहेब रोहकले आदी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, कळमकर हे राजकारणी नाहीत, असे कोण म्हणते? शिक्षकांच्या राजकारणातील त्यांची भाषणे मी बारकाईने ऐकली आहेत. त्यामुळे त्यांना आता राजकारणी म्हटले तरी चालेल, पण फक्त तिकडल्या झुंडी इकडं आणू नका! आपल्या कार्यकर्त्यांनाही कळमकर यांच्यासारखं बोलता आलं पाहिजे, त्यांनी लोकांची गरज ओळखली पाहिजे; यासाठी मी त्यांना ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’त पाठवणार आहे. डॉ. कळमकर यांनी केवळ शासकीय सेवाच केली नाही, तर सामाजिक भानही जपले आहे. आपल्या वाढदिवस आणि सेवापूर्तीचे औचित्य साधून त्यांनी ५ एकल (पालक नसलेल्या) गरीब मुलांचे बारावीपर्यंतच्या शिक्षणाचे संपूर्ण पालकत्व स्वीकारले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे मंत्री विखे यांनी कौतुक केले. डॉ. सबनीस म्हणाले, डॉ. कळमकर यांच्यात मोठी वैचारिक क्षमता आहे. मंत्री विखे यांनी ही क्षमता हेरली असून, या हिऱ्याला योग्य ठिकाणी कसे बसवायचे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. शिक्षकाने नेहमी संविधानाचा आदर करत मानवतेची बाजू घेतली पाहिजे आणि हेच कळमकर यांनी केल्यामुळेच आज इतकी मोठी माणसे त्यांच्या कौतुकासाठी एकत्र आली. प्रास्ताविक शिक्षक नेते सुदर्शन शिंदे यांनी केले. यावेळी कळमकर यांच्या मित्रमंडळाच्या वतीने, शिक्षकांसाठी डॉ. संजय कळमकर यांच्या नावाने एक वाचनालय सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आमचाही उद्धार केलाय डॉ. कळमकर यांचे अमोघ वक्तृत्व संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. आपल्या भाषणातून त्यांनी भल्याभल्यांना सोडले नाही. राजकारण्यांवर टोलेबाजी करताना त्यांनी आम्हालाही बऱ्याच कोपरखळ्या मारल्यात आणि आमचाही ‘उद्धार’ केला आहे. मात्र, आता ते शासकीय सेवेतून निवृत्त झालेत, आता त्यांना खरी परिस्थिती कळेल,” अशी मिश्किली विखे यांनी करताच एकच हशा पिकला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *