![]()
देशातील नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीनंतर आता महाराष्ट्राला ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) पेपरफुटीचा डाग लागला आहे. रविवार, २८ जून रोजी होणारी ही परीक्षा पेपर लीक झाल्यामुळे रद्द करावी लागल्यानंतर, आता संपूर्ण राज्यातून या ढिसाळ कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी एकमुखी मागणी कडाडून होऊ लागली आहे. ७ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या ‘डबल लीक’ सरकारविरोधात विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी या पेपरफुटीवरून शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. आसगावकर यांनी भुसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारला धारेवर धरले. “टीईटी पेपरफुटीमुळे राज्यातील तब्बल सात लाख प्रामाणिक परीक्षार्थींचे आणि भावी शिक्षकांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. हे सरकार केवळ आमदार आणि खासदार खोडाफोडीचे गलिच्छ राजकारण करण्यात मग्न आहे. त्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही चाड उरलेली नाही. शिक्षणमंत्र्यांनी या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेऊन नैतिकतेच्या नात्याने तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केलीये. पार्टी फोडता येते, पेपर सुरक्षित ठेवता येत नाही – अभिजीत दिपके कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर अत्यंत बोचरी आणि तीक्ष्ण टीका करत केंद्रीय आणि राज्य शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. “केंद्रात असो वा राज्यात, पेपर लीक झाल्याशिवाय हे भाजप सरकार एकही परीक्षा घेऊ शकत नाही, हे आता सिद्ध झाले आहे. हे ‘डबल इंजिन’ नाही तर ‘डबल लीक’ सरकार आहे,” असा टोला दिपके यांनी लगावला. राजीनाम्याची मालिका सुरू करा अभिजीत दिपके म्हणाले, “यांचे पक्षांतराचे सिक्रेट ऑपरेशन व्यवस्थित पार पडतात, पण यांना एक परीक्षेचा पेपर गोपनीय ठेवता येत नाही. हे म्हणजे आधी खून करायचा आणि नंतर खुन्याला पकडले म्हणून स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्यायच्या, असा हा प्रकार आहे. आधी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, तरच खाली योग्य संदेश जाईल. केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला, तरच भुसे साहेब राजीनामा देतील. पण लोकशाहीच्या रक्षणासाठी या दोन्ही राजीनाम्यांची नितांत गरज आहे,” असे स्पष्ट मत दिपके यांनी व्यक्त केले. रॅकेटमधील कोणत्याही दोषीला सोडणार नाही – शिक्षणमंत्री भुसे टीईटी पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांसमोर येत बचावात्मक पवित्रा घेतला. ते म्हणाले, “नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आम्ही या परीक्षेसाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली होती, तरीही हा प्रकार घडणे अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी याची तीव्र दखल घेतली आहे. भिवंडीतील कारवाईनंतर पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, या रॅकेटमध्ये सामील असलेल्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही.” शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर काय म्हणाले? शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, टीईटी परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठीच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या मते, नीट पेपरफुटीनंतर परीक्षा परिषदेने सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या. मात्र, भिवंडी परिसरात काही व्यक्तींकडे प्रश्नपत्रिका असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करून प्रश्नपत्रिका खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा रद्द करण्यात आली. हे ही वाचा… ‘TET’ पेपर फुटीप्रकरणात मोठी कारवाई:आरोपी दिल्लीहून आले, भिवंडी पोलिसांनी असा रचला सापळा, 1.5 कोटींची होती मागणी, आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक राज्यात 28 तारखेला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फोडणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या पेपरसाठी आरोपींनी तब्बल दीड कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सखोल तपासासाठी पोलिसांच्या विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
Source link
टीईटी पेपरफुटी प्रकरण:शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची मागणी