Headlines

सतर्क पोलिसांमुळे बालविवाह हाणून पाडला:रहिमतपूरमध्ये 15 वर्षीय मुलीला कायद्याचे संरक्षण, शिक्षण अन् पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू




सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळेत रोखण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे १५ वर्षे ३ महिने वयाच्या मुलीला कायदेशीर संरक्षण मिळाले असून तिचे शिक्षण आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रहिमतपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे यांना २६ जून रोजी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका गावाबाहेरील मंदिरात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने पथकासह मंदिरात धाव घेतली. त्या वेळी विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात होती आणि २५ ते ३० नातेवाईक उपस्थित होते. पोलिसांनी विवाहाची प्रक्रिया थांबवून मुलीच्या वयाची कागदपत्रे तपासली. त्यामध्ये संबंधित मुलगी विवाहासाठी आवश्यक असलेल्या १८ वर्षांच्या कायदेशीर वयोमर्यादेपेक्षा कमी वयाची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कोरेगाव येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करण्यात आली. महिला पोलिसांच्या मदतीने मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन तिच्या नातेवाईकांसह पोलिस ठाण्यात आणण्यात आले. महिला व बालविकास विभागाच्या अहवालानंतर तिला सातारा जिल्हा बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) समोर हजर करण्यात आले. बाल कल्याण समितीने संबंधित मुलीला ‘काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालिका’ घोषित करत सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर तिच्या समुपदेशन, शिक्षण आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ अंतर्गत १८ वर्षांखालील मुलीचा विवाह करणे किंवा त्यासाठी मदत अथवा प्रोत्साहन देणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिस किंवा चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलिस पथक आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव यांच्या समन्वयातून पार पडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *