![]()
अमरावती शहरातील शिलांगण रोडवरील (पालखी मार्ग) एका पुलाचे बांधकाम गेल्या चार महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. यामुळे हा पूल अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून, स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिलांगण रस्ता हा परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. पुलाचे काम रखडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वळण रस्त्याची रुंदी कमी असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच, बांधकामामुळे उडणारी धूळ आणि अर्धवट पडलेले साहित्य यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या मार्गावर मठ, मंदिरे, दवाखाने आणि विविध दुकाने आहेत. पुलाचे काम लांबल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही या भागातून प्रवास करताना अडचणी येत आहेत. पाच महिन्यांहून अधिक काळ उलटूनही काम पूर्ण न झाल्याने संबंधित कंत्राटदार आणि बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. साईनगरकडून गांधी चौकाकडे येताना वाहनधारकांना पुलाजवळ आल्यावरच काम सुरू असल्याचे लक्षात येते. यामुळे त्यांना सुमारे ३०० मीटर मागे जाऊन वळण घ्यावे लागते. संबंधित यंत्रणेने वळण रस्त्यासाठी कोणतेही सूचना फलक न लावल्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे. पुलाला लागूनच एक पेट्रोल पंप आहे. अनेक वाहनधारक येथे इंधन भरण्यासाठी येतात. मात्र, पुलाच्या कामामुळे त्यांना दूरवरून वळण घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचावे लागते. ज्यांच्या वाहनात कमी इंधन असते, त्यांना आपले वाहन ढकलत न्यावे लागते. ही समस्या टाळण्यासाठी काम लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Source link
शिलांगण रोडवरील पुलाचे काम चार महिन्यांपासून रखडले:नागरिक आणि वाहनधारक वाहतूक कोंडीने त्रस्त