Headlines

उपमहापौर ट्रॅफिकला वैतागले!:राणी बागेतील रिकाम्या बंगल्यासाठी संजय घाडी यांचे पालिका आयुक्तांना पत्र




मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी दैनंदिन प्रवासाचा त्रास कमी करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांकडे विशेष मागणी केली आहे. दहिसर (पूर्व) येथून दक्षिण मुंबईतील महापालिका मुख्यालयापर्यंत दररोज प्रवास करताना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई उद्यान परिसरातील रिकामा शासकीय बंगला राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. दहिसरच्या प्रवासाचा मनस्ताप आणि बैठकांना विलंब संजय घाडी हे सध्या पश्चिम उपनगरातील दहिसर (पूर्व) येथे राहतात. उपमहापौर या महत्त्वाच्या पदावर असल्याने त्यांना रोज दक्षिण मुंबईतील पालिका मुख्यालयात उपस्थित राहावे लागते. परंतु, दहिसरवरून येताना लागणारा प्रचंड वेळ आणि वाहतूक कोंडी यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, ट्रॅफिकमुळे महापालिकेतील महत्त्वाच्या बैठका आणि सेमिनारला पोहोचण्यास अनेकदा विलंब होतो. याच समस्येवर तोडगा म्हणून त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून मुंबई शहर भागातच निवासस्थान उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. नेमका कोणता बंगला हवाय? पूर्वी मुंबईच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील ऐतिहासिक बंगल्यात होते. मात्र, तिथे आता शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. त्यामुळे महापौरांचे निवासस्थान भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणी बाग) हलवण्यात आले आहे. याच राणी बागेत महापौरांच्या बंगल्याशेजारीच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचेही एक सेवा निवासस्थान आहे. हा बंगला सध्या रिक्त असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच बंगल्यासाठी उपमहापौर संजय घाडी प्रयत्नशील आहेत. एकीकडे आयुक्तांवर आरोप, दुसरीकडे बंगल्यासाठी पत्र या बंगल्याच्या मागणीसोबतच संजय घाडी आणि आयुक्त अश्विनी भिडे यांच्यातील अलीकडचा संघर्षही चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेला थेट पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनाच जबाबदार धरत घाडी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता या पत्रावर पालिका आयुक्त अश्विनी भिडे नेमकी काय भूमिका घेतात आणि उपमहापौरांना खरोखरच राणी बागेतील तो बंगला मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम:शरद पवारांना मागे टाकत ठरले महाराष्ट्राचे तिसरे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. 12 जुलै 2026 पर्यंत फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ 2,430 दिवसांचा (सुमारे 6 वर्षे 7 महिने) झाला असून, त्यांचा हा कार्यकाळ अद्यापही सुरू आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *