Headlines

विद्यापीठांनी रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत:शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा




राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यापीठांना आवाहन केले आहे की, त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ सध्याच्या नोकऱ्यांसाठीच नव्हे, तर भविष्यातील संधींसाठीही तयार करावे. शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण अत्यंत महत्त्वाचे असून, त्याद्वारे रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी अधोरेखित केले. पुण्यातील हॉटेल हयात येथे ‘डिजीआयआय १०० एक्स महाराष्ट्र, पुणे संवाद’ आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ) सहकार्याने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, सिम्बायोसिस सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, उच्च शिक्षण विभागाचे अप्पर सचिव आनंदराव पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक विनायक रत्नाकर पै यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल वर्मा यांनी विद्यापीठांना कौशल्य-आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचे आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी इनक्युबेशन केंद्रांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचे केंद्र बनले पाहिजे, जिथे विद्यार्थी केवळ रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार देणारे पदवीधर होतील, असे त्यांनी नमूद केले. रोजगार क्षमतेवर विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक पदवीधराने पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यापूर्वी अर्थपूर्ण कामाचा अनुभव घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपले पदवीधर रोजगारक्षम होत नाहीत, तोपर्यंत भारताकडे असलेल्या युवा लोकसंख्येचा पूर्ण फायदा उठवता येणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्राला प्रगल्भ सांस्कृतिक आणि नागरी वारसा लाभला असून, राज्यात पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे, असे राज्यपालांनी सांगितले. वारसा जतन, सांस्कृतिक संवर्धन, पायाभूत सुविधा आणि डिजिटल पोहोच यांचे प्रभावी एकत्रीकरण केल्यास पर्यटन हे रोजगार आणि आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन बनू शकते. यामध्ये विद्यापीठे संशोधन, दस्तऐवजीकरण, वारसा व्यवस्थापन, पर्यटन अभ्यास आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून योगदान देऊ शकतात. आपल्या पारंपरिक कला, हस्तकला, लोकपरंपरा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि कृषी विविधता यांचे जतन करून कृषी-पर्यटनाला (अ‍ॅग्रो-टूरिझम) चालना दिल्यास हजारो शाश्वत उपजीविका निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकभवनने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक पारंपरिक कलाप्रकार शोधून त्यांचे जतन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा समृद्ध सांस्कृतिक वारसा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहनही राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. पुण्याने अनेक पिढ्यांपासून भारताची एक प्रमुख ‘थिंक टँक’ (विचारवंत केंद्र) म्हणून भूमिका बजावली आहे. हे शिक्षण आणि बौद्धिक नेतृत्वाचे सर्वात महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. या ठिकाणी डिजीआयआय १०० एक्स सारख्या उपक्रमांमध्ये झालेल्या चर्चेचे रूपांतर अशा कृतीशील कल्पनांमध्ये होईल, ज्या केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेला बळकट करतील, असा विश्वासही वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *