Headlines

भाऊ गेला हेच मोठे नुकसान, हा पराभव गौण:गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य, धनंजय देशमुख यांचे अश्विनी देशमुखांच्या पराभवावर भाष्य




मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ग्राम पंचायत निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. या पराभवाची पंचक्रोशीत चर्चा सुरू असताना आता संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माझा भाऊ गेला हे आमचे मोठे नुकसान आहे. त्यापुढे हा पराभव गौण आहे. गावकऱ्यांचा कौल आम्हाला मान्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. या प्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मीक कराडला अटक झाली होती. पर्यायाने धनंजय मुंडे यांनाही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या परीने काम केले. परिणामी, राज्यात एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली. त्यामुळे मस्साजोगच्या ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण अखेर आज झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य धनंजय देशमुख यांनी या पराभवावर भाष्य करताना आपल्याला गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य असल्याचे स्पष्ट केले. आमचा भाऊ गेल्यामुळे आमच्या कुटुंबाचे सर्वात मोठे नुकसान झाले. त्यापुढे हा पराभव अत्यंत गौण आहे. गावकऱ्यांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो. या प्रकरणी ज्या काही अफवा पसरवल्या, त्या यापुढे पसरवू नयेत अशी आमची विनंती आहे. न्यायाची लढाई शेवटी कुटुंबीयांना व आम्हाला लढावी लागणार आहे. गावकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही ती लढू. आमच्यावर सीएसआर फंड आणल्याचा आरोप झाला. आरोप करणाऱ्यांनी तो पुराव्यानिशी सिद्ध करावा. संतोष अण्णाच्या स्वप्नातील गाव निर्माण करणे हा आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय मस्साजोगच्या संरपंचपदाच्या निवडणुकीच्या स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झाला. पहिल्या फेरीपासूनच त्यांनी अश्विनी देशमुख यांच्यावर आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत ते 156 मतांसह आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत त्यांनी त्यांना 20 मतांची वाढीव आघाडी मिळाली आणि अखेरीस तिसऱ्या फेरीत ते 92 मतांनी विजयी झाले. स्वरुपानंद देशमुख आता दिवंगत संतोष देशमुख यांना अभिवादन करून देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहावी, असा आग्रह धरण्यात आला होता. पण स्वरुपानंद देशमुख यांनी शेवटपर्यंत ही निवडणूक लढवण्यावर जोर दिला आणि शेवटी ते निवडून आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *