![]()
३३ केव्ही कोळगाव सबस्टेशनला होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी उपोषणाचा इशारा देताच महावितरणने याची तातडीने दखल घेतली आहे. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून वीजपुरवठा वाढवण्यात आला असून, आता २२ केव्ही ऐवजी २६ ते २७ केव्ही वीज येत असल्याने शेतीपंप सुरळीत चालू झाले आहेत. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर करमाळा पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या दालनात आंदोलक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी जेऊर महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी, “पाऊस सुरू होईपर्यंत व्होल्टेज वाढीव स्वरूपात देऊ आणि स्पेअर बे चे काम तात्काळ करून घेऊ,” असे लेखी आश्वासन दिले आहे. कोळगाव सबस्टेशन अंतर्गत अनेक दिवसांपासून कमी दाबाने वीज येत होती. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर होतच होते, पण कमी-जास्त व्होल्टेजमुळे मोटारी आणि स्टार्टर जळण्याचे प्रमाण वाढले होते. या आर्थिक भुर्दंडामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष होता. महावितरणने व्होल्टेज वाढवल्याने आता शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहू फरतडे, नागेश चेंडगे, सुनील बंडगर, संभाजी भोसले, हनुमंत नीळ आदी शेतकरी उपस्थित होते. ^यापुढे व्होल्टेज कमी झाल्यास किंवा शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास थेट बार्शी येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल. शंभुराजे फरतडे, युवासेना तालुकाप्रमुख. ^आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रोजच्या पेक्षा व्होल्टेज नक्कीच वाढले आहे. ही बातमीची व आंदोलनाची धमक आहे. वाढीव विजेचा दाब कायम राहिला पाहिजे एवढीच अपेक्षा. — सतीश घाडगे, शेतकरी, कोळगाव. युवासेनेने दिला इशारा
Source link
कोळगाव सबस्टेशनचा वीजपुरवठा तातडीने वाढवा:22 ऐवजी आता 27 केव्ही वीज पुरवठा सुरू; शेतकऱ्यांच्या जळणाऱ्या मोटारींना दिलासा