पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे पंतप्रधानपद भूषविल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी, शेतीसमोरील आव्हाने आणि आगामी एल निनोच्या परिणामांबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. कर्जमाफीवर विरोधका
.
कर्जमाफीत अटी नाहीत, फक्त बँकिंग व्यवस्था वाचवण्यासाठी एक तरतूद
फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत कोणत्याही कठोर अटी किंवा शर्ती घातलेल्या नाहीत. मात्र, महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँका आणि ग्रामीण बँकिंग व्यवस्था टिकून राहावी यासाठी एक विशेष अट ठेवण्यात आली आहे.
त्यांच्या मते, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी वारंवार कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्यांनाही यावेळी मदत दिली जाणार आहे. मात्र, ठरावीक मर्यादेपर्यंतच कर्ज माफ करण्यात येईल आणि उर्वरित रक्कम संबंधित शेतकऱ्यांनी भरावी लागेल. अन्यथा सहकारी बँकांची आर्थिक स्थिती डळमळीत होऊन संपूर्ण बँकिंग व्यवस्था धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
40 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील 40 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी सुरळीत व्हावी आणि उद्भवणाऱ्या अडचणी तातडीने सोडवता याव्यात यासाठी विशेष मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत मुख्यमंत्री स्वतः, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पुढे सरकत असताना उद्भवणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी या समितीकडे असेल.
निवडणुकीसाठी नव्हे, शेतकऱ्यांसाठी निर्णय
कर्जमाफीचा निर्णय राजकीय फायद्यासाठी घेतल्याच्या आरोपांनाही फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, राज्यात सध्या कोणतीही मोठी निवडणूक समोर नसताना सरकारने स्वतःहून हा निर्णय घेतला आहे.
“जर राजकीय लाभ हाच उद्देश असता, तर 2029 च्या निवडणुकीपूर्वी 2028 च्या अखेरीस कर्जमाफी जाहीर करता आली असती. मात्र आमचा हेतू राजकारण नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे,” असे ते म्हणाले.
निसर्गाचे आव्हान मोठे; क्लायमेट-प्रूफ शेतीची गरज
शेतीसमोरील संकटांबाबत बोलताना फडणवीस यांनी हवामान बदल हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे नमूद केले. बदलत्या वातावरणामुळे पारंपरिक शेतीपद्धतींमध्ये बदल करण्याची वेळ आली असून ‘क्लायमेट-प्रूफ’ शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
एल निनोसाठी टास्क फोर्स तयार
यंदा एल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष टास्क फोर्स स्थापन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असली तरी जलसंधारणाची कामे वेगाने सुरू असून संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वामिनाथन आयोगावरही काँग्रेसवर टीका
यावेळी त्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींचाही उल्लेख केला. “2004 मध्ये स्वामिनाथन आयोगाचा अहवाल आला होता. मात्र पुढील दहा वर्षे तो लागू करण्यात आला नाही. नरेंद्र मोदी सरकारने 2016 मध्ये या आयोगाच्या महत्त्वाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला,” असा दावा फडणवीस यांनी केला.
कर्जमाफीवरील वाद कायम राहणार?
सरकारच्या मते ही कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे, तर विरोधकांचा आरोप आहे की अटींमुळे अनेक लाभार्थी अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर किती शेतकऱ्यांना लाभ मिळतो आणि किती जणांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी एल निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या उपाययोजना किती प्रभावी ठरतात, हेही आगामी काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा…
शेतकरी कर्जमाफीचा वाद- कोण पात्र, कोण अपात्र?:नेमके काय आहेत निकष? टीका का होत आहे? 5 प्रश्नांमधून समजून घ्या योजनेविषयी सर्वकाही

राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, सरकारने घातलेल्या विविध अटी आणि शर्तींमुळे अनेक शेतकरी यातून वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनीही या योजनेवर फसवी म्हणत आक्षेप घेतल आहेत. या विषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात विविध शंका उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर या योजनेविषयी या ५ प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेऊया… येथे वाचा सविस्तर बातमी
‘मोदी केवळ सर्वाधिक काळ पंतप्रधान नाहीत, तर सर्वोत्कृष्टही’:फडणवीसांनी केले कौतुक, काँग्रेसला ‘बुडते जहाज’ म्हणत विरोधकांवरही हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कामगिरीचा गौरव केला. देशाची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, डिजिटल व्यवहार, महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मूलन आणि जागतिक स्तरावरील भारताची वाढती प्रतिष्ठा यांचा उल्लेख करत फडणवीस यांनी मोदी यांना “केवळ सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान नव्हे, तर देशाचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान” असे संबोधले. याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवरही टीका करत काँग्रेसला “बुडते जहाज” म्हटले. येथे वाचा सविस्तर बातमी