![]()
आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या साताऱ्यातील आठ तरुणांवर सोमवारी मध्यरात्री उशिरा अत्यंत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेनंतर आसगाव, मर्ढे आणि खटाव परिसरात शोककळा पसरली असून गावागावांत हळहळ व्यक्त होत आहे. हे सर्व युवक कर्दे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासा दरम्यान पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली. या अपघातात सर्व आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर आणि प्रतापगड ट्रेकर्सच्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत कठीण परिस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले. मृतांपैकी पाच युवक आसगाव येथील असल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. मध्यरात्री उशिरा मृतदेह गावात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. गावातील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. त्यानंतर दोन ट्रॅक्टर ट्रॉलींमधून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले आणि एकाचवेळी पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मर्ढे येथील दोन तरुणांवर तसेच खटाव येथील एका युवकावर पहाटेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अश्रुपूर्ण निरोप दिला. या दुर्दैवी घटनेने सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
Source link
आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप:आसगाव, मर्ढे आणि खटाव गावांमध्ये शोककळा; मध्यरात्री अंत्यसंस्कारावेळी हंबरडा