Headlines

कन्नडमधील तलाव कोरडेठाक:पाऊस लांबल्याने मत्स्य व्यावसायिक संकटात, पाऊस पडेल या आशेवर जलसाठ्यात बीज सोडण्याचा निर्णय‎




तालुक्यामध्ये चालू वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ खरिपाची पेरणी होईल एवढाच मर्यादित पाऊस झाला असून, बहुतांश पाझर तलाव आणि मुख्य जलसिंचन प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत. नदी-नाल्यांना अद्याप मोठा पूर आलेला नाही. या भीषण जलसंकटामुळे तालुक्यातील १० ते ११ हजार लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेला मत्स्य व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन महिना-दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही जलसाठ्यांमध्ये पाणी नसल्याने, आता करायचे काय? असा यक्षप्रश्न मच्छीमारांसमोर उभा ठाकला आहे. भोई समाज सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत लाडे यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, तालुक्यात यंदा जवळपास महिनाभर विलंबाने पाऊस सुरू झाला. अद्याप कोणताही मोठा पाऊस न झाल्याने जलस्रोत कोरडे आहेत. तरीही, पुढे चांगला पाऊस येईल या एकाच आशेवर मच्छिमारांनी उपलब्ध असलेल्या अल्पशा जलाशयांमध्ये मत्स्यबीज सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. जर पुढील काळात पावसाने पुन्हा दांडी मारली, तर हे सोडलेले लाखो रुपयांचे मत्स्यबीज पाण्यातच वाया जाण्याची भीती लाडे यांनी व्यक्त केली आहे. शासनाने या संकटसमयी गोड्या पाण्यातील मच्छिमारांना तातडीने अनुदानित मत्स्यबीज आणि मासेमारीची जाळी देऊन आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. अंबाडी प्रकल्पावरील मत्स्य व्यावसायिक सुभाष बाविस्कर यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे धरणात सोडलेले मत्स्य आणि झिंगाबीज वाहून गेले होते, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. यावर्षी परिस्थिती अगदी उलट असून धरणात अत्यंत कमी पाणी शिल्लक आहे. परिणामी, पाण्याच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे मोठे मासे तडफडून मरत आहेत. समुद्रातील मासेमारीला शासन मोठ्या प्रमाणावर मदत करते, मात्र गोड्या पाण्यातील पारंपरिक मच्छिमारांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तलावाची पाहणी करताना कैलास लाडे, कुसुम तेली, व मच्छिंद्र भुतांबरे, कचरू भुतांबरे, सखाराम भुतांबरे, गोरख भुतांबरे, कवरचंद मेंगाळ, राजेंद्र मेंगाळ, निरगुडी येथील सुरेश ठाकर, शिवनाथ ठाकर, चेतन वायडे, अनिता लाडे आदी व्यावसायिक उपस्थित होते. तालुक्यात २४ मच्छीमार सहकारी संस्था सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमोल शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यात एकूण २४ मच्छिमार सहकारी संस्था कार्यरत असून, सुमारे ११०० नोंदणीकृत मच्छिमार यावर अवलंबून आहेत. पुरेशा जलसाठ्याअभावी सर्वच व्यावसायिक संकटात आहेत. शासन स्तरावरून त्यांना काय मदत मिळवून देता येईल, या संदर्भातील प्रशासकीय पाठपुरावा सुरू आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देऊनही कोणतीही ठोस मदत किंवा जुन्या नुकसानीचे अनुदान मिळालेले नाही. शासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *