![]()
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी काँग्रेससह ‘इंडी’ आघाडीवर गंभीर आरोप केले. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ आणि परिसीमन विधेयकाला विरोध करून काँग्रेसने महिलांसह महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रतिनिधित्वाच्या हक्काचा विश्वासघात केला आहे, असे सूर्या म्हणाले. महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार प्रणिली शिंदे यांच्या चर्चेच्या आवाहनावर सूर्या म्हणाले की, त्यांनी वेळ आणि जागा निश्चित करावी, आपण सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहोत. भाजप पुन्हा मोठ्या ताकदीने महिला विधेयक संसदेत आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकसभा आणि सर्व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’तील दुरुस्ती आणि परिसीमन विधेयक संसदेत पारित होऊ शकले नव्हते. या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेससह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेला युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, प्राजक्ता जोशी, प्रणव गंजीवाले आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. सूर्या यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या प्रयत्नांनंतरही काँग्रेस आणि ‘इंडी’ आघाडीच्या घटक पक्षांनी महिला आरक्षणाचा मार्ग रोखला. संसदीय इतिहासात १९९६ पासून आजपर्यंत एकूण पाच वेळा महिला आरक्षण विधेयक संसदेत आले. प्रत्येक वेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सुनियोजित कट रचून महिला आरक्षणाला विरोध केला. भाजपने मात्र विरोधात असतानाही महिला आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आगामी काळात संसदेत पुन्हा ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ मांडले जाईल आणि त्यावेळी कोणताही पक्ष महिलाविरोधी भूमिका घेण्याची हिंमत करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसचा इतिहास महिलाविरोधी असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, काँग्रेसने महिलांच्या प्रगतीत कायम अडथळे आणले आहेत. हिंदू महिलांना हक्क देणाऱ्या ‘हिंदू कोड बिला’ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी विरोध केला होता, ज्यामुळे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शहाबानो खटल्यातही काँग्रेसने व्होटबँकेचे राजकारण करत गरीब मुस्लिम महिलांवर अन्याय केला. तसेच, तिहेरी तलाकच्या अमानवी आणि बेकायदा प्रथेचे समर्थन केले, अशी टीका सूर्या यांनी केली. परिसीमन विधेयकामुळे महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ५० टक्के जागा ‘प्रो-रेटा’ तत्त्वावर वाढविण्यात येणार होत्या. मात्र, काँग्रेससह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी याला विरोध केल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार आहे, असे सूर्या म्हणाले. याबाबत मतदारांनी विरोधकांना जाब विचारला पाहिजे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या ५४३ जागांची पुनर्रचना केल्यास महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ एक अतिरिक्त जागा येईल, असेही त्यांनी नमूद केले.
Source link
काँग्रेसने महिला आरक्षण, परिसीमन विधेयकाचा विश्वासघात केला- सूर्या:महाराष्ट्रासह महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या हक्काचा विश्वासघात, भाजप कटिबद्ध