![]()
आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हजारो वारकरी, भाविक आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण काटेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. मात्र, हे रिंगण इतर रिंगणांपेक्षा वेगळे ठरते कारण येथे अश्वांचे (घोड्यांचे) नाही, तर ‘मेंढ्यांचे गोल रिंगण’ पार पडते. या रिंगण सोहळ्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पण, या रिंगणात नेमक्या मेंढ्याच का धावतात? यामागे कोणता रंजक इतिहास दडलेला आहे? ते जाणून घेऊया. मेंढ्यांनी मारल्या रथाला तीन प्रदक्षिणा! काटेवाडी येथील या अनोख्या सोहळ्यात मेंढ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या रथाला वेगाने तीन प्रदक्षिणा घातल्या आणि हे पहिले गोल रिंगण पूर्ण झाले. वारकऱ्यांनी आणि विठ्ठल भक्तांनी हा नयनरम्य सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. हा सोहळा पार पडल्यानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील सणसर या पुढच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. मेंढ्यांच्या रिंगणामागील ३०० वर्षांचा इतिहास काटेवाडीत मेंढ्यांचे गोल रिंगण घालण्याच्या या परंपरेला शेकडो वर्षांचा मोठा इतिहास आहे. जुन्या जाणकारांच्या मते, अनेक वर्षांपूर्वी या परिसरातील मेंढ्यांवर एक भयानक रोगराई आली होती. यामध्ये रोज अनेक मेंढ्या मृत्युमुखी पडत होत्या. आपल्या डोळ्यांसमोर मेंढ्यांचा मृत्यू होत असल्याने धनगर आणि मेंढपाळ समाज हवालदिल झाला होता. नेमक्या त्याच वेळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या मार्गावरून जात होता. त्यावेळी कोणीतरी मेंढपाळांना सांगितले की, “तुकोबारायांच्या पालखीसमोर जाऊन पांडुरंगाला साकडे घाला.” त्याप्रमाणे मेंढपाळांनी पालखीसमोर जाऊन, “आमच्या मेंढ्या वाचू दे, त्यांचा मृत्यू थांबू दे आणि आमचे जीवन सुखी होऊ दे,” असे साकडे घातले. आश्चर्य म्हणजे, त्यानंतर खरोखरच मेंढ्यांचा मृत्यू थांबला, अशी आख्यायिका आहे. त्या दिवसापासून काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मेंढ्यांचे गोल रिंगण’ घालण्याची परंपरा सुरू झाली, जी आजही अखंडपणे पाळली जात आहे. “विठ्ठलाने आमचं भलं केलं” – मेंढपाळांची भावना या परंपरेबाबत मेंढपाळ सोमनाथ माने यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, “ही परंपरा आजची नाही, तर गेल्या जवळपास ३०० वर्षांपासून चालत आलेली आहे. आमच्या पूर्वजांनी ही परंपरा सुरू केली, जी आज आम्ही पुढे नेत आहोत आणि उद्या आमची मुलेही हे मेंढ्यांचे गोल रिंगण सुरूच ठेवतील.” ते पुढे म्हणाले, “जेव्हापासून हे साकडे घातले गेले, तेव्हापासून मेंढ्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आणि बकऱ्यांची संख्या वाढतच गेली. या परंपरेमुळे विठ्ठलाने आमच्यावर मोठी कृपा केली असून, आमच्या घरात सुख-समृद्धी नांदत आहे.”
Source link
काटेवाडीत पार पडले तुकोबांच्या पालखीचे पहिले रिंगण:मेंढ्या का मारतात रथाला प्रदक्षिणा? जाणून घ्या 300 वर्षांचा इतिहास