Headlines

काळजाचा थरकाप!:आंबेनळी घाटात दुचाकी 700 फूट खोल दरीत कोसळली; वाईचे दाम्पत्य जागीच ठार




महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात गुरूवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दाम्पत्य दरीत पडून जागीच ठार झालं. मोहन चव्हाण (वय ५५) आणि राजश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी, ता. वाई), असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. घाटातील धोकादायक वळणावर मोटरसायकल बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. पाऊस आणि धुक्यामुळे प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सनी खडतर परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन राबवून दोन्ही मृतदेह दरीतून वर आणले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वाईतील मोहन चव्हाण आणि राजश्री चव्हाण हे दाम्पत्य हिरो स्प्लेंडर मोटरसायकलवरून (एम. एच. ११ सी. एल. ८२८७) आंबेनळी घाटातून प्रतापगडला निघाले होते. घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल संरक्षक कठड्याला धडकून बॅरिकेट्समध्ये अडकली. मात्र, मोटरसायकलवरील दाम्पत्य दरीत पडले. ७०० फूट खोल दरीत दाम्पत्य मृतावस्थेत आढळून आलं आहे. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळ हे पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. दरम्यान, या भीषण अपघातानंतर आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवकाळी पाऊस आणि दाट धुक्यामुळे गुरूवारी रात्री दीड वाजता बचावकार्य थांबवण्यात आले होते. निसरड्या उतारांमुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे रेस्क्यू टीमला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. अखेर प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सने आज सकाळी मृतदेह दरीतून वर काढले. या घटनेत पोलादपूर पोलीस आणि महाबळेश्वर पोलीस यंत्रणेनेही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला हातभार लावला. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. आंबेनळी घाट हा अत्यंत धोकादायक वळणांचा आणि खोल दऱ्यांचा घाट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वेग मर्यादित ठेवावा, सतर्कता बाळगावी आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *