Headlines

जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप:म्हणाले- मराठा मंत्रालयाची मागणी अवास्तव; आंदोलनालाही इशारा




मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठी भूमिका जाहीर केली आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी जवळपास दीड तास चर्चा करूनही कोणताही तोडगा न निघाल्याने जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या वतीने आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे. माध्यमांशी संवाद साधताना हाके म्हणाले की, जर मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरूच राहिले आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का बसणार असेल, तर आम्हीही शांत बसणार नाही. उद्यापासून राज्यभरातील ओबीसी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल. जरांगे बाजेवर बसून आंदोलन करत असतील, तर आम्ही ढेकळात बसून आंदोलन करू, असे म्हणत त्यांनी संघर्षाची भूमिका स्पष्ट केली. आंदोलनाची तारीख, वेळ आणि ठिकाण याबाबतची माहिती उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्यांवरही कठोर टीका केली. मराठा समाजासाठी स्वतंत्र ‘मराठा मंत्रालय’ किंवा ‘कुणबी मंत्रालय’ स्थापन करण्याची मागणी त्यांनी अवास्तव असल्याचे म्हटले. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्याच्या राजकारणात मराठा समाजाचे मोठे प्रतिनिधित्व राहिले आहे. मंत्रिमंडळात काही मोजके ओबीसी, एससी, एसटी किंवा अल्पसंख्याक प्रतिनिधी वगळता बहुतांश नेतृत्व मराठा समाजाकडेच राहिले आहे. अशा परिस्थितीत स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करण्याचे कारण काय, असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. एखाद्या चळवळीचे नेतृत्व करताना विषयाचे ज्ञान, अभ्यास आणि तारतम्य आवश्यक असते. मात्र सध्याच्या मागण्या वास्तवाशी विसंगत असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक समाजाने स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली तर प्रशासन चालवणे कठीण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे अशा मागण्यांमुळे समाजात संभ्रम निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. हाके यांनी या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचाही आरोप केला. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करणे, सरकारवर दबाव वाढवणे आणि काही राजकीय समीकरणांना चालना देणे हा या आंदोलनाचा उद्देश असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री पदावर परिणाम घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे आरक्षणाच्या मूळ प्रश्नाऐवजी राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले. राजकीय आणि सामाजिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे याचबरोबर त्यांनी कंत्राटी भरती, खासगीकरण आणि रोजगाराच्या मुद्द्यांकडेही लक्ष वेधले. खासगीकरणामुळे शासकीय नोकऱ्यांची संख्या कमी होत असून आरक्षण व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या कंपन्यांचाही उल्लेख करत त्यांनी सरकारने या विषयांवर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय आणि सामाजिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *