Headlines

डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन:शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट म्हणून ओळख; मानसिक आरोग्य चळवळीचा चेहरा पडद्याआड




मानवी मनाचे बारकावे, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि मनोविकारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आयुष्यभर काम करणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आजारांकडे भीती किंवा लाज म्हणून न पाहता, तोही इतर शारीरिक आजारांप्रमाणेच सामान्य विषय आहे, ही भावना समाजात रुजवण्यासाठी मोठे कार्य केले. सामान्य माणसालाही सहज समजेल अशा भाषेत त्यांनी मानसिक आरोग्याविषयी लेखन आणि मार्गदर्शन केले. मनोविकारांबद्दलची भीती कमी करण्यासाठी त्यांनी व्याख्याने, पुस्तके, नाटके आणि समुपदेशनाच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांच्या कामामुळे हजारो लोकांना मानसिक आरोग्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची दिशा मिळाली. वैद्यकीय क्षेत्रासोबतच साहित्य आणि नाट्यविश्वातही त्यांनी वेगळी छाप सोडली. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’, ‘आम्ही जगतो बेफाम’ यांसारखी नाटकेही त्यांनी लिहिली. ‘मयसभा’ या नाटकाला लेखन पुरस्कार मिळाला होता. तर ‘गेट वेल सून’ या नाटकाच्या कथासंकल्पनेलाही मोठी दाद मिळाली होती. ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘एका सायकिअ‍ॅट्रिस्टची डायरी’, ‘माझं प्रिस्क्रिप्शन’, ‘मनोगती’, ‘मुक्तिपत्रे’, ‘स्वभाव-विभाव’ आणि ‘हेही दिवस जातील!’ यांसारख्या अनेक पुस्तकांमधून त्यांनी मानवी मनाचा वेध घेतला. डॉ. नाडकर्णी यांनी 1980 मध्ये एमबीबीएस आणि 1984 मध्ये मनोविकारशास्त्रात एमडी पदवी मिळवली. शिक्षण घेत असतानाच मनोविकारांविषयी समाजात जागृती निर्माण करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली होती. त्यातूनच 23 मार्च 1990 रोजी ठाण्यात ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ अर्थात ‘आयपीएच’ संस्थेची स्थापना झाली. ही संस्था केवळ मानसिक आजारांवर उपचार करणारी न राहता, व्यक्तिमत्त्व विकास, समुपदेशन, कुटुंबीयांना मार्गदर्शन आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणारे केंद्र बनली. साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला आणि संवाद या माध्यमांचाही त्यांनी उपचार प्रक्रियेत प्रभावी वापर केला. ‘शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट’ म्हणून ओळख ‘शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट’ म्हणून ओळख निर्माण करणारे डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ डॉक्टर नव्हते, तर संवेदनशील विचारवंत आणि समाजप्रबोधन करणारे व्यक्तिमत्त्व होते. मानसिक आरोग्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा ठसा दीर्घकाळ कायम राहणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *