Headlines

आमचा खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका:तो भाऊसाहेब नव्हे, 'खाऊसाहेब'; शिर्डीत उद्धव ठाकरेंचा वाकचौरेंवर कडाडून हल्ला




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये झंझावाती दौरे करत आहेत. या मोहिमेत आज त्यांनी शिर्डीचे आराध्य दैवत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले आणि त्यानंतर आयोजित जाहीर सभेतून शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडले. “काहींच्या नसानसात आणि रक्तातच गद्दारी भिनलेली असते, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब. हा भाऊसाहेब नव्हे, तर ‘खाऊसाहेब’ वाकचौरे आहे. जिथे जाईल तिथे फक्त ‘खाऊ’ खायचा, हाच यांचा एककलमी कार्यक्रम आहे,” अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली. सभेच्या सुरुवातीलाच मैदानावर घडलेल्या एका गमतीशीर प्रसंगाचा धागा पकडत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, “मी भाषणाला उभा राहण्यापूर्वी इथे एक अनाऊन्समेंट झाली की, कोणाच्या तरी गाडीची चावी हरवली आहे, ती सापडल्यास आणून द्यावी. मलाही तुम्हाला एक तशीच महत्त्वाची सूचना करायची आहे; आपला इथला खासदार पळाला आहे! तो जर तुम्हाला कुठे सापडला, तर त्याला सोडू नका आणि अजिबात परत आणू नका. आता या जगात नक्की विश्वास तरी कोणावर ठेवायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.” वाकचौरेंचे पलायन हाच ‘शुभशकुन’; सरकार पडणार! खासदार वाकचौरे यांच्या बंडखोरीवर बोलताना ठाकरेंनी २०१४ मधील एका राजकीय योगायोगाची आठवण करून दिली. “सभेला येण्यापूर्वी मला काही स्थानिक लोक भेटले. ते म्हणाले की, साहेब या गद्दाराचे जाणे हा आपल्यासाठी शुभशकुन आहे. २००९ मध्ये आपण याला हक्काने निवडून दिले, पण २०१४ ला हा पळून गेला. हा पळाला आणि राज्यात आपले सरकार आले! यंदाही इतिहास पुनरावृत्त होणार आहे. या गद्दारांच्या पापाचा घडा भरला असून हे विद्यमान सरकार पडल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवित्र शिर्डीत ‘श्रद्धा-सबुरी’ हवी, यांना तर रोज नवीन बाप लागतो शिर्डीच्या पावन भूमीचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी गद्दारांच्या नैतिकतेवर बोट ठेवले. ते म्हणाले, “ही पवित्र शिर्डी नगरी आहे, जिथे साईबाबांच्या ‘श्रद्धा आणि सबुरी’ला सर्वोच्च स्थान आहे. माणसाची कुठेतरी निष्ठा असावी लागते. आपली निष्ठा साईबाबांवर, जनतेच्या कामावर आणि भगव्या झेंड्यावर आहे. पण या गद्दारांची कशावरच श्रद्धा नाही आणि सबुरीचा तर पत्ताच नाही. यांना रोज नवीन बाप लागतो! जरा संयम ठेवला असता, तर उद्या येणारं सरकार आपलंच आहे. देवानेच उद्याच्या स्वच्छ सरकारमध्ये हे भ्रष्ट विचारांचे लोक नकोत म्हणून त्यांना ही दुर्बुद्धी दिली असावी, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.” शेळीसारखं १०० दिवस जगण्यापेक्षा… या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. तसेच शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह भरताना त्यांनी शेवटी “१०० दिवस शेळीसारखे लाचार होऊन जगण्यापेक्षा, १ दिवस वाघासारखे डौलात आणि हिमतीने जगलेले कधीही चांगले!” असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. हे ही वाचा… फडणवीसांना PM पदासाठी पाठिंबा देणार का?:उद्धव ठाकरे म्हणाले- गद्दार सोडून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, पण RSS चा पाठिंबा असूनही फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले होते. आज शिर्डीत पत्रकारांनी त्यांना फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार का? असे विचारले असता ते म्हणाले, आधी फडणवीसांनी जाहीर करावे की, ते पंतप्रधान पदाची तयारी करत आहेत. पण त्यांनी आपली भूमिका मांडल्यास ते पक्षात राहतील का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सोबतच गद्दार सोडून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा. देवेंद्र फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे. मात्र, त्यांच्या करिअरची आपल्याला चिंता वाटते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *