Headlines

संघाचा पाठिंबा असलेल्या फडणवीसांचे पंख कापण्याचे कारस्थान:मला त्यांच्या राजकीय करिअरची चिंता, उद्धव ठाकरेंचा टोला




शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बंडानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. पक्षातील सहा खासदारांच्या फुटीनंतर निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उद्धव ठाकरे मागील तीन दिवसांपासून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आक्रमक दौरे करत आहेत. आज शिर्डीत शिवसैनिकांशी संवाद साधण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘डिलिमीटेशन बिल’ (मतदारसंघ पुनर्रचना विधेयक) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीवरून भाजपवर जोरदार शरसंधान केले. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टिप्पणी करत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवले. ते म्हणाले, “मला देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याची मनापासून काळजी वाटते. मी हे केवळ वरवर किंवा चेष्टा-मस्करी म्हणून बोलत नाहीये. महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने देशपातळीवर नेतृत्व करण्याचे किंवा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिले, तर त्यात काहीही गैर नाही. यापूर्वी भाजपमधून नितीन गडकरी यांचे नाव या शर्यतीत घेतले जात होते. गडकरींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) मोठा पाठिंबा होता, मात्र त्यांना काही कारण नसताना बाजूला सारून बदनाम करण्यात आले. आता देवेंद्र फडणवीस हा एक चांगला आणि सक्षम चेहरा समोर आहे. फडणवीस यांनाही संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे माझ्या कानावर आले आहे. म्हणूनच, संघाचा पाठिंबा असलेला हा मराठी माणूस उद्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊच नये, म्हणून हे सगळे अंतर्गत कारस्थान चालले आहे की काय? अशी शंका घ्यायला नक्कीच जागा आहे.” गद्दारांवर बोलण्याची लायकी नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख ‘शहा सेना’ असा केला. “हा गट आता शिवसेना राहिलेला नसून ती ‘शाह सेना’ झाली आहे. त्यामुळे अशा गद्दारांच्या सरदाराबद्दल मला काहीही बोलायचे नाही, ते माझ्या टीकेच्या लायकीचेही नाहीत,” अशा कडक शब्दांत त्यांनी शिंदेंचा समाचार घेतला. डिलिमीटेशन विधेयकावर सरकारला सुनावले खडे बोल अलिकडेच संसदेत मंजूर न झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमीटेशन) विधेयकाबाबत केंद्र सरकारने आपल्याशी किंवा विरोधी पक्षांशी काही संपर्क साधला होता का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत ‘नाही’ असे उत्तर दिले. ते म्हणाले, “आमच्याशी कोणताही समन्वय साधण्यात आलेला नाही. आमची भूमिका आजही ठाम आहे की, आम्ही केवळ विरोधी पक्ष नसून कोट्यवधी जनतेचे अधिकृत प्रतिनिधी आहोत.” संसदेत जनतेचे प्रश्न आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिला आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. सरकारला सल्ला देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणतेही मोठे विधेयक आणण्यापूर्वी सरकारने सर्व पक्षनेत्यांची बैठक बोलावून त्यांना ते समजावून सांगायला हवे. आमच्या काही सूचना किंवा आक्षेप असतील तर त्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आज तुम्ही सत्तेत आहात, कदाचित उद्या आम्ही असू आणि तुम्ही विरोधी बाकांवर असाल. त्यामुळे राजकारणापेक्षा समोर ‘देशहित’ असणे सर्वात महत्त्वाचे आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *