![]()
तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे एका ३५ वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. प्रदीप शेषराव वाघ असे त्यांचे नाव असून, त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप वाघ नेहमीप्रमाणे कामानिमित्त बाहेर गेले होते. तीव्र उष्णतेमुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या विदर्भासह राज्यातील अनेक भागांत उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि मजुरी करणाऱ्या कामगारांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. प्रदीप वाघ यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, दोन भाऊ आणि मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवला आहे.
Source link
तळेगावमध्ये ३५ वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू:उष्माघाताने झाल्याची शक्यता; कुटुंबावर दुःखाचा प्रसंग