![]()
कडाक्याच्या उन्हाने माळशिरस आणि इंदापूर तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदीचे पात्र आता पूर्णपणे कोरडे पडले आहे. नदीत पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने काठच्या गावांमध्ये शेती, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला
.
नीरा नदीकाठचा हा भाग प्रामुख्याने ऊस, केळी आणि फळबागांसाठी ओळखला जातो. मात्र, नदी कोरडी पडल्याने आणि विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट झाल्याने लाखो रुपये खर्च करून जोपासलेली ही पिके आता सुकू लागली आहेत. पिकांना जगवायचे कसे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. नदीकाठच्या विहिरींवर आधारित असलेल्या अनेक गावांच्या नळ योजना आता ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. विहिरींनी तळ गाठल्याचा थेट फटका खालील गावांना बसत आहे. एकशिव, कळंबोली, कळंब, बांगर्डे, भोरकरवाडी, पलसमंडळ या बाधित गावात आगामी काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नीरा नदीवरील गिरवी, ओझरे, लुमेवाडी आणि सराटी हे बंधारे सलग दोन वर्षांपासून कोरडे आहेत. अनेक बंधाऱ्यांचे ढापे खराब झाल्याने पाणी आले तरी ते साठवणे कठीण झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देऊन बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नदी आटल्याने केवळ शेतकरीच नाही, तर मच्छिमार समाजही संकटात आला आहे. व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ^नदीपात्रात पाणी नसल्यामुळे आमची उभी पिके धोक्यात आली आहेत. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित नीरा नदीत पाणी सोडावे, अन्यथा शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होईल. संजय वाघमोडे, माजी सरपंच . माळशिरस तालुका: संगम, गणेशगाव, बिजवडी, सवतगाव, तांबवे, माळीनगर, अकलूज, कळंबोली. . इंदापूर तालुका: सराटी, लिंबूडी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, गिरवी, नरसिंहपूर, निरनिमगाव, भगतवाडी, पिठेवाडी, चाकाटी.
नीरा नदीत पाणी सोडावे