Headlines

पंतप्रधान-राष्ट्रपती पदापेक्षा जनतेचं प्रेम मोठं; नितीन गडकरींचं मोठं विधान:झेड प्लस सुरक्षेवर मिश्कील टिप्पणी; नागपुरातील भाषण चर्चेत




केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाबाबत मोठं विधान केलं आहे. जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद हीच आयुष्यातील खरी संपत्ती आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होण्याची गरज काय? लोकांचं प्रेम हेच सर्वात मोठं पद आहे, असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. नागपुरातील राष्ट्रभाषा परिवारातर्फे आयोजित मित्रों के बीच, या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनुभवही मांडले. वय वाढतं, राजकारण बदलतं, पण लोकसेवा हा आमचा मुख्य उद्देश आहे, असे ते म्हणाले. देशाच्या विविध भागांत मिळणाऱ्या प्रेमाबद्दल सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. काश्मीरमध्ये एखादा ढाबेवाला नागपूरहून आलोय हे समजल्यावर बिल घेत नाही. मेघालय, त्रिपुरा यांसारख्या राज्यांतही लोक मोठ्या आपुलकीने वागतात, असे गडकरी यांनी सांगितले. लोकांकडून मिळणारे हे प्रेमच आपल्याला कामाची प्रेरणा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. आम्ही जॉर्ज फर्नांडिस यांना खूप मानायचो. त्यांनी आयुष्यभर साधेपणा जपला. विमानतळावर स्वागत, हार-तुरे त्यांना अजिबात आवडत नसत, असे गडकरी म्हणाले. त्यांनी सांगितले की, एकदा जॉर्ज फर्नांडिस मुंबईत त्यांच्या घरी आले होते आणि त्यानंतर दोघेही कोणतीही सुरक्षा न घेता गिरगाव चौपाटीवर ज्यूस प्यायला गेले होते. त्या काळातील साधेपणा आणि आजच्या व्हीआयपी संस्कृतीतील फरकही त्यांनी अधोरेखित केला. सुरक्षा व्यवस्थेवर मिश्कील शैलीत टिप्पणी सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर भाष्य करताना गडकरींनी मिश्कील शैलीत टिप्पणी केली. पूर्वी माझ्यासोबत कोणतीही सुरक्षा नसायची, पण आता 50 पोलिस असतात. माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगून मला ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. स्वागतासाठी विमानतळावर कोणी येऊ नये, हे आपण गेली 45 वर्षे पाळत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी गंमतीने म्हणायचो की, माझ्या स्वागताला विमानतळावर कुत्राही येत नाही. आता मात्र सुरक्षा पथकातील कुत्रा आधी राऊंड मारतो आणि मग मी जातो, असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. हार आणि पुष्पगुच्छांचा आपल्याला तिरस्कार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले. साधेपणा, लोकांशी थेट नातं आणि जनतेकडून मिळणारं प्रेम यालाच त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं यश मानलं. त्यांच्या भाषणातील साधेपणा आणि थेट शैलीमुळे कार्यक्रमात उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *