Headlines

पुण्यात 67,956 थकबाकीदारांनी अभय योजना धुडकावली:सजग नागरिक मंचाचा सवाल, महापालिका प्रशासनावर कारवाईचा दबाव




पुणे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबवण्यात आलेल्या अभय योजनेला हजारो सराईत थकबाकीदारांनी धुडकावून लावल्याचे समोर आले आहे. एकूण ६७,९५६ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. या पार्श्वभूमीवर, अशा थकबाकीदारांवर महापालिका प्रशासन नेमकी कधी आणि कोणती कारवाई करणार, असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत ही अभय योजना जाहीर केली होती. यापूर्वी २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्येही अशाच योजना राबवण्यात आल्या होत्या. मात्र, या योजनांचा लाभ घेतल्यानंतरही अनेक करदाते पुन्हा थकबाकीदार झाल्याचे दिसून आले आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, २०२०-२१ च्या अभय योजनेचा लाभ १,४९,६८३ करदात्यांनी घेतला होता. त्यापैकी ६७,४७५ जण १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुन्हा थकबाकीदार झाले. यातील ४२,६९६ जणांनी नव्या अभय योजनेकडे पूर्णपणे पाठ फिरवली. त्याचप्रमाणे, २०२१-२२ मधील ६६,४५४ लाभार्थ्यांपैकी ३८,६४२ जण पुन्हा थकबाकीदार झाले आहेत. यापैकी २५,२६० जणांनी देखील यंदाच्या योजनेचा लाभ घेतलेला नाही. अशा प्रकारे एकूण ६७,९५६ थकबाकीदारांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिका प्रशासनाने उत्पन्नवाढीच्या उद्देशाने वारंवार अभय योजना राबवून सराईत थकबाकीदारांना सवलती दिल्या, मात्र त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे. प्रामाणिकपणे वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे नाराजी निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “अभय योजना धुडकावून लावणाऱ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करून स्पष्ट संदेश देणे आवश्यक आहे,” अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. यावर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *