![]()
पुण्यात ‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘पु. ल. परिवार’ यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय पु. ल. स्मृती महोत्सवाला बुधवार, २४ मे रोजी सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पंडित तळवलकर यांनी पु. ल. देशपांडे यांना ‘अतिशय आनंददायी ऊर्जा’ असे संबोधले आणि कला क्षेत्रातील त्यांचे योगदान युवा पिढीला समजणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पंडित तळवलकर म्हणाले की, संगीत ही अमूर्त भाषा असल्याने पुलं जे संगीत जगले त्यात एक वेगळाच अर्थ भरलेला होता. त्यांनी पु. ल. देशपांडे यांचे संगीत क्षेत्रावरील प्रेम जवळून पाहिले होते. पुलं स्वतः उत्तम संगीतकार आणि गुरू होते. दुसऱ्या कलाकाराच्या कलेचा निखळ आनंद घेत त्याचे गुणगान करणे हा त्यांचा मोठा गुण होता, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, लोकमान्य मल्टिर्पपज को-ऑप. सोसायटी लि.चे स्वागताध्यक्ष सुशील जाधव, संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर, प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी, नाट्यकर्मी किरण यज्ञोपवित, शिल्पकार प्रमोद कांबळे आणि डॉ. मंदार परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. पंडित सुरेश तळवलकर यांनी पुढे सांगितले की, दुसऱ्या कलाकाराच्या कलेचा निखळ आनंद घेत त्याचे कौतुक करणे ही गोष्ट त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्याकडूनच शिकली. कलाकाराच्या चेहऱ्यावरूनच तो पुढे काय सादर करणार आहे याचा अंदाज पुलंना यायचा. ही प्रतिभा आणि प्रज्ञा फक्त पुलंजवळच होती. त्यांच्या शेजारी बसण्यानेही एक वेगळीच ऊर्जा मिळत असे. पुलं यांच्या व्यक्तिमत्वात प्रामाणिकपणा होता आणि तो पचविणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. कृष्णकुमार गोयल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पुलंचे व्यक्तिमत्व विरळे होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात पुलंनी काळाच्याही पलिकडे जाऊन कार्य केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन देते. पुलं स्मृती महोत्सवाच्या माध्यमातून पुलंचे संपूर्ण व्यक्तिमत्व आणि एक कलाकार म्हणून त्यांनी केलेले कार्य युवा वर्गापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. प्रास्ताविकात वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले की, अष्टपैलू हा शब्द तोकडा पडावा एवढे गुण आणि पैलू पुलंच्या व्यक्तिमत्वात होते. अशा महनीय व्यक्तीची भावमुद्रा संपूर्ण जगावर कोरली जावी या हेतूने या आनंदयात्रेचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाच्या माध्यमातून उत्तम श्रोता घडावा आणि पुढील पिढीतील कलाकारांवर सांस्कृतिक संस्कार व्हावेत हा हेतू आहे. गेल्या वर्षी आयोजित महोत्सवाच्या व्यासपीठावरून पुलंच्या नावे विद्यापीठात अध्यासन केंद्र उभारण्याची सरकारी घोषणा झाली होती, मात्र एक वर्ष उलटूनही अध्यासनाच्या पूर्ततेसाठी एकही कागद हललेला नाही, अशी खंत चित्राव यांनी व्यक्त केली.
Source link
पु. ल. स्मृती महोत्सवाला पुण्यात सुरुवात:पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, पुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा