![]()
हिंगोली पालिकेत काम करतांना नागरीकांनी दाखविलेले प्रेम व विश्वास कधीही विसरू शकणार नाही, नागरीकांच्या सहकार्यामुळे हिंगोली पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यस्तरावर क्रमांक मिळवू शकलो असे प्रतिपादन तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी गुरुवारी ता. २५ केले आहे. हिंगोली येथील पालिकेच्या सभागृहात तत्कालीन मुख्याधिकारी मुंढे यांचा बदली झाल्याबद्दल सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष माबूद बागवान, नगरसेवक अमेर अली, गुड्डू बांगर, नाना नायक, कैलास शहाणे, रत्नाकर अडशिरे, शाम माळवटकर, बाळू बांगर, प्रतिक नाईक यांच्यासह नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्याधिकारी मुंढे म्हणाले की, हिंगोली पालिकेत मागील चार वर्षात काम करतांना सर्वच नागरीक, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य मिळाले. नागरीकांच्या पाठबळावरच स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वीपणे राबविता आले. या शिवाय वृक्ष लागवड अभियान, स्वच्छ शहर सुंदर शहर यासह इतर संकल्पना राबविता आल्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये हिंगोली पालिकेचा राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. या शिवाय या अभियानात सातत्य राखण्यात यश मिळाले आहे. हिंगोली शहराच्या विकासासाठीही सर्वांचे सहकार्य मिळाले असून प्रत्येक प्रभागात रस्ते कामांसह मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. शहराच्या भल्यासाठीच काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागले. यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा असून यावेळीही नागरीकांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले हे पालिकेवरील तसेच माझ्यावरील विश्वासाचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम आपल्या कार्यकाळात सुरु झाले याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात हिंगोलीत काम करण्याची संधी मिळाली तर पुन्हा एकदा काम करण्यास नक्कीच आवडेल असे त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन बाळू बांगर यांनी केले.
Source link
हिंगोलीकरांनी दाखविलेले प्रेम कधीही विसरणार नाही:मुख्याधिकारी अरविंद मुंढेंचे प्रतिपादन, बदली झाल्याबद्दल पालिकेकडून सत्कार