![]()
खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. सामंत यांनी संजय दीना पाटील यांची बाजू सावरून धरत, विरोधकांनाही टोला लगावला. ते म्हणाले, “संजय दीना पाटील यांची वागण्याची पद्धत आणि देहबोलीच तशी आहे. त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली असून, पक्षाने त्यांच्या वक्तव्याचे कुठेही समर्थन केलेले नाही. आता हा विषय सर्वांनी इथेच थांबवावा.” संजय दीना पाटील यांच्या स्वभावाचे विश्लेषण करताना उदय सामंत यांनी भूतकाळातील घटनांचा उल्लेख केला. सामंत म्हणाले, “चार-साडेचार वर्षांपूर्वी आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो, त्याच फेजमधून आता संजय दीना पाटील जात आहेत. आमच्या वेळी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणाऱ्यांना धमक्या दिल्या जायच्या. संविधानाचा आदर करून विचार बदलणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. कदाचित त्याच मनस्तापाचा राग पत्रकारांवर निघाला असावा.” संजय दीना पाटील यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांवर बोलताना सामंत म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी गेली २५ वर्षे मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांच्यासारखा जीवाला जीव देणारा दिलदार मित्र असूच शकत नाही.” सामंत यांनी पुढे सांगितले की, त्यांनी स्वतः आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. भविष्यात त्यांच्याकडून अशी भूमिका परत घेतली जाणार नाही, असे शिंदेंनी त्यांना समजावले आहे. सामंत यांनी, “तरीही त्यांच्या बोलण्यामुळे कोणी दुखावले असेल, तर मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो,” असे म्हटले. महाविकास आघाडीत सुरू असलेल्या पडझडीवर आणि ‘ऑपरेशन टायगर ३.०’ यावर बोलताना सामंत यांनी स्पष्ट केले की, याला काही विशेष क्रमांक देण्याची गरज नाही; कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रोजच पक्षप्रवेश सुरू आहेत. मविआच्या आमदारांचीच आमच्यासोबत येण्याची इच्छा असेल, तर आम्ही त्यांना का नाकारावे, असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा उल्लेख केला. सामंत म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे आमचे आणि एकनाथ शिंदेंचे खूप चांगले मित्र आहेत. पक्षप्रवेशाबाबत त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, पण वडेट्टीवारांसारख्या विदर्भातील धडाडीच्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला, तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल.”
Source link
उदय सामंतांचे संजय पाटील यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण:म्हणाले- पाटील दिलदार मित्र, पण पत्रकारांवरील रागाचे कारण वेगळे