![]()
केतन अग्रवाल खून प्रकरणानंतर विवाहपूर्व पार्श्वभूमी पडताळणीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशनच्या संचालिका डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी पत्रकार परिषदेत हे प्रतिपादन केले. त्यांनी विवाहपूर्व तपासणी, विवाहबाह्य संबंध, वैवाहिक फसवणूक, आर्थिक गुन्हे, घटस्फोट आणि कौटुंबिक वादांसंदर्भातील अनुभव सांगितले. प्रिया काकडे यांच्या मते, लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असला तरी, आजही अनेक कुटुंबे केवळ आर्थिक स्थिती, सामाजिक प्रतिष्ठा, शिक्षण किंवा बाह्य आकर्षणावर आधारित विवाह ठरवतात. भावी वधू किंवा वराचे पूर्वीचे संबंध, घटस्फोट, आर्थिक व्यवहार, गुन्हेगारी पार्श्वभूमी, मानसिक स्थिती यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची पडताळणी केली जात नाही. यामुळे पुढे गंभीर कौटुंबिक आणि कायदेशीर समस्या निर्माण होतात. केतन अग्रवाल आणि राजा रघुवंशी यांसारख्या अलीकडील घटनांनी विवाहबाह्य संबंध, फसवणूक, जबरदस्तीने लावलेली लग्ने, खोटी माहिती देऊन जुळवलेले विवाह आणि आर्थिक स्वार्थातून निर्माण होणाऱ्या वादांचे प्रमाण वाढत असल्याचे दाखवून दिले आहे. काकडे यांनी सांगितले की, अनेकदा सामाजिक दबावामुळे अनिच्छेने विवाह केले जातात. काही प्रकरणांमध्ये पूर्वीचे प्रेमसंबंध लपवले जातात, ज्यामुळे लग्नानंतर काही महिन्यांतच वाद, मानसिक छळ, घटस्फोट किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडतात. योग्य वेळी पार्श्वभूमी पडताळणी केल्यास अशा अनेक घटना टाळता येऊ शकतात. प्री-मॅट्रिमोनियल तपासणीमध्ये व्यक्तीची वैवाहिक स्थिती, पूर्वीचे विवाह किंवा घटस्फोट, आर्थिक व्यवहार, मालमत्ता, गुन्हेगारी नोंदी, सामाजिक वर्तणूक, व्यसनाधीनता आणि चालू संबंध यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची पडताळणी केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. लग्नाच्या प्रक्रियेदरम्यान सतत टाळाटाळ करणे, संवाद टाळणे, वारंवार खोटी कारणे देणे, कुटुंबाशी संपर्क टाळणे किंवा लग्नाबाबत अनास्था दाखवणे ही धोक्याची चिन्हे (रेड फ्लॅग्स) असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशनने २००६ पासून आतापर्यंत विवाहपूर्व पडताळणी, विवाहबाह्य संबंध, आर्थिक फसवणूक, कौटुंबिक वाद, बेपत्ता व्यक्तींचा शोध, मॅट्रिमोनियल फ्रॉड आणि कॉर्पोरेट तपास अशा 2,048 हून अधिक प्रकरणांचा यशस्वी तपास केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. “आमचा उद्देश केवळ संशय निर्माण करणे नसून, वस्तुस्थिती समोर आणणे आहे. विवाहपूर्व योग्य माहिती मिळाल्यास अनेक कुटुंबांचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान टाळता येते. सत्य माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय नेहमीच सुरक्षित असतो,” असे काकडे यांनी स्पष्ट केले.
Source link
केतन अग्रवाल प्रकरणानंतर विवाहपूर्व तपासणीची गरज अधोरेखित:अनेक कुटुंबे फसवणूक आणि संकटांपासून वाचू शकतात – डिटेक्टिव्ह प्रिया काकडे