![]()
लेखिका व संशोधक अमी गणात्रा यांच्या ‘व्हाय आर वी धिस वे: अ गाईड टू हिंदू शास्त्राज’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवाराचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. हिंदू शास्त्रांचा उद्देश केवळ परंपरांचे पालन करणे नसून, व्यक्तीमध्ये विवेकबुद्धी जागृत करणे हा आहे, असे प्रतिपादन गणात्रा यांनी यावेळी केले. हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात नेशन फर्स्ट आणि चाणक्य मंडल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुस्तकाची संकल्पना आणि लेखनामागील प्रेरणा स्पष्ट करताना अमी गणात्रा म्हणाल्या की, भारत हा रामायण, महाभारत आणि वेदांची समृद्ध परंपरा लाभलेला देश आहे. नागरीकरणामुळे समाजात बदल झाले असले तरी, हिंदू संस्कृतीने नेहमीच विवेकबुद्धीला सर्वोच्च स्थान दिले आहे. तीर्थयात्रा आणि नदीपूजन यांसारख्या परंपरांमागील तात्त्विक आणि पर्यावरणीय दृष्टिकोन समजून घेतल्यास त्यांचा खरा लाभ समाजाला होऊ शकतो. शास्त्रांमधून विवेक जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. या परंपरांमागील खरा भाव आणि पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे पावित्र्य व महत्त्व समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सनातन म्हणजे भारतीय आणि भारतीय म्हणजेच हिंदू होय. भारत हे राष्ट्र हजारो वर्षांच्या संकटातून सावरून पुन्हा उत्थानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताची जीवनदृष्टी उदार, सहिष्णू आणि विज्ञानाधिष्ठित असून, अमी गणात्रा यांनी हा विचार आपल्या पुस्तकात सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे. लेखक पंकज सक्सेना यांनी हिंदू धर्मातील शास्त्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. विवेकबुद्धी जागृत ठेवण्यासाठी सातत्याने ध्यान आणि चिंतन आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला नेशन फर्स्टचे संस्थापक सुनील भोसले, बोध संस्थेचे संस्थापक पंकज सक्सेना, मेजर वंदना शर्मा, डॉ. सुधीर काळकर, डॉ. वासुदेव ऐतल व केदारनाथ चक्रदेव आदी मान्यवर उपस्थित होते. हडपसरच्या विकासात योगदान देणाऱ्या रघुनाथ तुपे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
Source link
हिंदू शास्त्रांचे सार विवेक जागृती: अमी गणात्रा:अमी गणात्रांच्या ‘व्हाय आर वी धिस वे’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन