Headlines

डॉ. संजय उपाध्ये: आहार-संयमाने मिळते स्वास्थ्य, मनःशांती:श्री सरस्वती कराड हॉस्पिटलच्या वर्धापन दिनी आवाहन




उत्तम आरोग्य आणि मनःशांतीसाठी आहार व बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. श्री सरस्वती कराड रुग्णालयाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. उपाध्ये म्हणाले की, प्रत्येकाने स्वतःला ओळखून आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यास आरोग्य सुधारते. श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास यांचा योग्य ताळमेळ साधून आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी मातोश्री स्व. सरस्वती कराड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या श्री सरस्वती कराड रुग्णालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम एमआयटी कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडला. यावेळी उषा विश्वनाथ कराड, विश्वस्त प्रकाश जोशी, विद्या जोशी, सह कार्यकारी विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एसएसकेएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिरीष भातलवंडे आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अमोल सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी हसणे हे सर्वोत्तम औषध आहे. परिस्थिती व व्याधीला विनोदी बुद्धीने स्वीकारण्याची कला आत्मसात करावी. शरीराचे मालक बनण्याऐवजी सतत ट्रस्टीची भावना ठेवावी, असेही डॉ. उपाध्ये यांनी सांगितले. आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण प्रतिक्रिया आणि विचार असतात. व्याधी आल्यावर डॉक्टरांवर विश्वास ठेवून उपचार करावेत आणि स्वतःचे आत्मचिंतन करून आजाराचे कारण शोधावे. भय संपले की जीवनात आनंदाचे अंकुर फुटतात, असे ते म्हणाले. अहंकार आणि केवळ शाब्दिक ज्ञान जीवनाला रुक्ष करतात. त्यामुळे आयुष्यात ‘सिरियस’ न होता ‘ॲडजस्ट’ करायला शिका, म्हणजेच ‘जस्ट ॲड’ करा. आपल्या आचरणावरच मनःशांती आणि उत्तम आरोग्य अवलंबून असते, असे डॉ. उपाध्ये यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी रुग्णालयाबद्दल माहिती दिली. स्वास्थ्य, सेवा आणि सुशिक्षण या तीन तत्त्वांवर आधारित या हॉस्पिटलमध्ये १०० पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णसेवा दिली जात आहे. अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा या रुग्णालयात दर्जेदार रुग्णसेवा देण्याकरिता आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. तुषार खाचणे यांनी रुग्णालयाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विविध योजना, ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. तसेच तपासण्यांवर दिली जाणारी सूट आणि आरोग्य सुविधांची विस्तृत माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *