![]()
रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने भावंडांमधील प्रेमाचा धागा वेळेत पोहोचवण्यासाठी टपाल विभागाने तयारी केली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी अमरावती रेल्वे स्थानकातील टपाल सेवा केंद्रात एक अतिरिक्त काउंटर उघडण्यात आले आहे. हे काउंटर आगामी २८ ऑगस्टपर्यंत सुरू राहील, अशी माहिती उपअभिलेख अधिकारी प्रकाश हागे यांनी दिली. सध्या टपाल मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध टपाल कार्यालयांमध्ये राख्या पाठवण्यासाठी बुकिंग सुरू आहे, ज्यामुळे नागरिकांची गर्दी वाढली आहे. देशाच्या विविध भागांत आणि परदेशात राहणाऱ्या भावंडांना राखी वेळेत मिळावी यासाठी स्पीड पोस्ट, पार्सल, रजिस्टर्ड पोस्ट आणि आंतरराष्ट्रीय सेवांचा वापर केला जात आहे. राख्या सुरक्षितपणे पाठवण्यासाठी आकर्षक आणि विशेष राखी पाकिटेही उपलब्ध आहेत. ग्राहकांना पार्सलच्या सेवांसह आयटीपीएसची (International Tracked Packet Service) सुविधाही मिळत आहे, ज्यामुळे परदेशातील भावंडांना राखी पाठवणे सोपे झाले आहे. सध्या दररोज हजाराहून अधिक पार्सल्स पाठवली जात आहेत. आजच्या डिजिटल युगात व्हिडिओ कॉल, ऑनलाइन भेटवस्तू आणि सोशल मीडियावरून शुभेच्छा देता येत असल्या तरी, प्रत्यक्ष हाताने निवडलेली राखी टपालाद्वारे भावापर्यंत पोहोचवण्याची भावना आजही कायम आहे. परदेशात किंवा दुसऱ्या शहरात नोकरी-व्यवसायानिमित्त राहणाऱ्या भावंडांपर्यंत टपालाने पोहोचणारी राखी केवळ एक वस्तू नसून तो एक भावनिक संदेश ठरत आहे. राखीसोबत इतर भेटवस्तूही पाठवल्या जात आहेत. खाजगी कुरिअर किंवा ऑनलाइन पर्यायांपेक्षाही नागरिक टपाल सेवेलाच अधिक पसंती देत आहेत. काउंटरवर बुकिंग झाल्यापासून ते बारकोडिंग, मेल बॅग, सॉर्टिंग, वाहतूक, गंतव्य शहरातील प्रक्रिया, वितरण कार्यालय आणि पोस्टमनपर्यंतचा हा प्रवास एका राखीला तिच्या अंतिम ठिकाणी पोहोचवतो. जिल्ह्यातील ३५४ टपाल केंद्रांचे मोठे जाळे आणि त्यामागे काम करणारी टपाल यंत्रणा यात महत्त्वाची भूमिका बजावते. देशातील विविध शहरांपासून थेट परदेशापर्यंत राखी पोहोचवण्याची जबाबदारी या यंत्रणेवर असते. एका काउंटरवर बुक झालेली राखी भावाच्या हातापर्यंत पोहोचण्यापूर्वी अनेक टप्प्यांतून जाते, ज्यामुळे टपाल विभागाची मोठी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांचे अदृश्य श्रम या छोट्याशा धाग्यामागे दडलेले आहेत.
Source link
रक्षाबंधनासाठी टपाल विभाग सज्ज:रेल्वे स्थानकात अतिरिक्त काउंटर, नागरिकांची पसंती टपाल सेवेलाच