![]()
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेले अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याची भावना व्यक्त करत गोरेगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. शेतकऱ्यांनी दिवाळीसाठी जाहिर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पाच हजार रुपयांचा धनादेश शुक्रवारी ता 16 टपाला मार्फत पाठवला आहे. सणासुदीच्या काळात खाद्यतेल, साखर, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाची दिवाळी साजरी कशी करावी? मुला-बाळांना नवीन कपडे कसे घ्यावेत? दिवाळीचा फराळ कसा करावा? असे प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी सरकारच्या मदतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? शेतकऱ्यांना शेतीतील वाढता खर्च, पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच दिवाळीसारखा मोठा सण साजरा करण्यासाठी सरकारकडून मिळणारी मदत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाच हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा सण साजरा करणे शक्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारने दिलेल्या मदतीतून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार नसतील, तर अशा मदतीचा उपयोग काय, असा संतप्त सवाल करत गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाच हजार रुपयांचा धनादेश पाठवून आपला निषेध व्यक्त केला. ‘मुख्यमंत्री साहेब, तुम्हीच पाच हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा!’ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या धनादेशातून सरकारच्या मदतीबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने ठोस मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे. गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी केलेल्या या अनोख्या निषेधाची परिसरात चर्चा सुरू असून, सरकार या प्रकाराची आणि शेतकऱ्यांच्या नाराजीची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
शेतकऱ्यांना दिलेले अनुदान म्हणजे थट्टाच:हिंगोलीच्या संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाच पाठवला 5 हजारांचा धनादेश