Headlines

Vijay Wadettiwar Warning to Maharashtra Govt Over Beed Scam


“महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरी 37 टक्क्यांपर्यंत पाऊस कमी झाला असून दुष्काळाने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, या भीषण संकटातही शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणारे भ्रष्ट लांडगे सत्तेच्या वळचणीला बसून तिजोरी लुटायला टपले आहेत.

.

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी बीडमधील कथित 80 कोटींच्या पशुधन घोटाळ्याचा पर्दाफाश केला, दुष्काळी मदतीच्या 5 हजार रुपयांच्या अग्रिमाची पोलखोल केली, महायुतीमधील अंतर्गत विसंवाद, उमर खालिदवरील आरोप, आंदोलक तरुणींवरील पोलीस दडपशाही आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी मनुस्मृतीबाबत केलेल्या विधानांचा अत्यंत परखड शब्दांत समाचार घेतला.

बीडमध्ये 80 कोटींचा बोगस प्रस्ताव; दुष्काळात सरकारी तिजोरीवर दरोडा!

दुष्काळ निवारणाच्या नावाखाली प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचारावर बोट ठेवताना वडेट्टीवार म्हणाले, “दुष्काळात शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पशुधन योजना आणली जात असताना, बीड जिल्ह्यात 80 कोटींचे बोगस प्रस्ताव तयार करण्यात आले. ‘वैदेही ॲग्रो’ कंपनीच्या संचालकांनी सरकारमधील काही लोकांच्या आशीर्वादाने हा उपद्व्याप केला होता. या नालायक घटकांनी शेतकऱ्यांच्या पदरात मदत पडण्याआधीच ती लाटण्याची तयारी केली होती. सुदैवाने वेळीच तक्रार झाल्याने ते प्रस्ताव रद्द झाले; मात्र दुष्काळातही सरकारी तिजोरी लुटायला अनेक लांडगे टपून बसले आहेत.”

गुजरातला झुकते माप, महाराष्ट्राला ठेंगा

“देशात सरासरी 13 टक्के पाऊस कमी झाला, तर महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांत 37 टक्क्यांपर्यंत तूट आहे. गुजरात सरकारला न मागता केंद्राकडून तातडीने मदत मिळते; पण महाराष्ट्रात केंद्राचे पाहणी पथक येऊन गेले तरी मदतीचा पत्ता नाही. पीक विमा कंपन्या 200-400 रुपयांची भिकार मदत देऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहेत.”

5 हजार रुपयांत काय दिवे लावणार?

शासनाने जाहीर केलेल्या 5 हजार रुपयांच्या अग्रिम मदतीचा समाचार घेताना ते म्हणाले, “काही मूर्ख लोक सांगतात की 5 हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल. बाजारात आज चण्याची डाळ 100 रुपये किलो, गोडेतेल 180 रुपये लिटर आणि साखर 60 रुपये किलोवर पोहोचली आहे. पाच हजारात शेतकऱ्यांची मुले नवीन कपडे घेणार की गोडधोड खाणार? ही मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.”

हेक्टरी 1 लाखांची मदत द्या, अन्यथा मंत्र्यांना अडवणार

“कर्ज काढून का होईना राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रतिहेक्टरी 1 लाख रुपयांची थेट मदत दिलीच पाहिजे. अन्यथा, संतापलेला शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि गावागावांत मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारेल.”

उमर खालिदवर अडीच वर्षांत पुरावे का दिले नाहीत?

कन्हैय्या कुमार, कुणाल कामरा यांच्या पोस्ट आणि दिल्लीतील आंदोलनावर भाष्य करताना त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. “केवळ अल्पसंख्याक समाजाचा आहे म्हणून अडीच वर्षे एखाद्या तरुणाला विनाचार्जशीट डांबून ठेवायचे? जर तो दहशतवादी असेल तर पुरावे समोर आणा आणि त्याला थेट फाशी द्या. पण पुरावे सार्वजनिक का करत नाही? सरकारच्या विरोधात जो बोलेल त्याला ‘खलिस्तानी’, ‘शहरी नक्षलवादी’, ‘दहशतवादी’ आणि ‘देशद्रोही’ ठरवणे हा भाजपचा एकमेव धंदा झाला आहे.”

पोलिसांची अमानुष दडपशाही

“दिल्लीत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या एका तरुणीला सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन चार पोलिसांनी तिच्या प्रायव्हेट पार्टवर मारहाण केली. थू तुमच्या या व्यवस्थेवर! एकीकडे देवीचा जागर करायचा, ‘राम’ आणि ‘रावण’ यातला फरक न समजणाऱ्या नेत्यांनी रामाचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात रावणासारखी कृत्ये करायची, हा ढोंगीपणा आहे. अमेरिकन नागरिकत्व असलेला अभिनेता इमरान खान आंदोलनात सहभागी झाला म्हणून त्याला देश सोडण्याची नोटीस बजावली जाते. लोकांचा लोकशाही मार्गाने बोलण्याचा अधिकारच हिरावला जात आहे.”

महायुतीचे दिवाळे निघाले, होळीपर्यंत आपसातच जळून खाक होतील!

स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील महायुतीच्या राजकारणावर वडेट्टीवार यांनी भाष्य केले. “सावली तालुक्यातील आमच्या तालुका अध्यक्षांच्या कुटुंबातील चार सुशिक्षित मतदारांची नोंदणी झालेली असताना पदवीधर मतदार यादीतून त्यांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली. भाजप इमानदारीने निवडणुका जिंकू शकत नाही, केवळ मतचोरी करूनच जिंकू शकते.”

महायुतीत एकमेकांची जिरवण्याची स्पर्धा

“पुण्यात शिंदे गटाने भाजपविरोधात सचिन सानप या अपक्षाला बळ दिले आहे. दसरा-दिवाळीनंतर या सरकारचे पूर्ण दिवाळे निघेल आणि येत्या होळीपर्यंत महायुतीमधील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकून स्वतःच जळून भस्म होतील. रोज दिल्लीत एकमेकांच्या विरोधात तक्रारी सुरू आहेत आणि मंत्रालयात फायली अडवल्या जात आहेत.”

नथुरामचे गोडवे गाणाऱ्यांना संविधानाचा अधिकार नाही!

अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘मनुस्मृती हा जगातील पहिला संविधान ग्रंथ आहे’ असे विधान केल्याच्या मुद्द्यावर वडेट्टीवार अत्यंत आक्रमक झाले. “शरद पोंक्षे हा मनुस्मृतीच्या विचाराने आंधळा झालेला अर्धवट शहाणा माणूस आहे. सावरकरांची नाटके करणारा आणि नथुराम गोडसेच्या विचारांचे समर्थन करणारा हा माणूस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतो आहे. नथुराम हा या देशातील पहिला दहशतवादी होता, म्हणूनच १०० वर्षे झाली तरी कोणाची आपल्या मुलाचे नाव ‘नथुराम’ ठेवण्याची हिंमत झाली नाही.”

मनुस्मृती लागू झाल्यास स्त्रिया गुलाम बनतील

“ज्या मनुस्मृतीचे गोडवे पोंक्षे गात आहेत, त्या मनुस्मृतीत महिलांचे आणि बहुजन-शूद्रांचे स्थान काय होते? मनुस्मृती लागू झाली तर या देशातील तमाम माता-भगिनी केवळ भोगवस्तू बनतील, त्यांना उंबरठ्याबाहेर पडण्याचा अधिकार उरणार नाही आणि शुद्रांना गुलाम बनवले जाईल. अशा मनुस्मृतीवादी विचारांच्या लोकांना भारतात संविधानाच्या संरक्षणात राहण्याचा अधिकार आहे का?”, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

मालेगाव खटल्यातील फाशीच्या निकालाचे स्वागत

डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी विजय खैरनारला मालेगाव न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे त्यांनी स्वागत केले. “अशा विकृत नराधमांना केवळ फाशीची शिक्षा न देता चौकात आणून गोळ्या घातल्या पाहिजेत, तरच समाजात कायद्याची दहशत निर्माण होईल. एकीकडे कुलदीप सेंगरसारख्या बलात्कारी आमदारांची मिरवणूक काढायची आणि दुसरीकडे देवीचे जागर करायचे, हा भाजपचा दुटप्पी चेहरा आहे,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी शेवटी केला.

—————————————————————–

हेही वाचा…

प्रत्यक्षदर्शी नव्हता, CCTV नव्हते; तरीही फाशीपर्यंत खेचून नेले!: डोंगराळेच्या 4.5 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार-खून प्रकरणाची कहाणी, 10 महिन्यांत 50 सुनावण्यांनंतर निकाल

डोंगराळे (ता. मालेगाव) येथे अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर पशूप्रमाणे अनन्वित लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपी विजय खैरनार (वय 24) याला मालेगाव येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने थेट फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना तसेच परिसराचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही, विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांची अशी अभेद्य साखळी न्यायालयात विणली की, अवघ्या 10 महिन्यांत 50 सुनावण्यांनंतर आरोपीला फाशीपर्यंत पोहोचवले. या अत्यंत अमानुष घटनेला न्यायालयाने ‘निर्भया’ प्रकरणाप्रमाणेच ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) मानून हा निकाल दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.