Headlines

शैक्षणिक बदलांमुळे प्राध्यापकांना आत्मपरीक्षणाची गरज:‘नुटा’ बुलेटिनच्या सुवर्णमहोत्सवात प्रा. लवांडे यांचे आवाहन




कोरोना महामारीनंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची वाढलेली अनुपस्थिती चिंताजनक आहे. पारंपरिक घोकमपट्टीऐवजी अध्यापनात आधुनिक बदल स्वीकारण्याची गरज असून, परीक्षा पद्धतीतील शिथिलता आणि विना-अनुदानित संस्थांचा वाढता प्रभाव यामुळे शिक्षण क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. या बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व प्राध्यापक वर्ग आणि संघटनांनी संघटित राहून प्रामाणिक आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन प्रा. एस.पी. लवांडे यांनी केले. नागपूर विद्यापीठ टिचर्स असोसिएशनचे (नुटा) मुखपत्र असलेल्या ‘नुटा बुलेटिन’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या पाच दशकांच्या संघर्षमय आणि वैचारिक वाटचालीचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाचे माजी महासचिव प्रा. असोक बर्मन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा, एमफुक्टोचे सरचिटणीस डॉ. आर. के. चव्हाण, नुटाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण रघुवंशी आणि सरचिटणीस डॉ. नितीन कोंगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी नुटा बुलेटिनने विदर्भातील प्राध्यापकांमध्ये संवाद, जागृती आणि संघटन मजबूत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचे नमूद केले. कार्यक्रमात नुटा बुलेटिनचा सुवर्णमहोत्सवी विशेषांक तसेच प्रा. बी. टी. देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रकाशित ‘संघर्ष यात्रेतील दीपस्तंभ’ या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. डॉ. किशोर फुले यांनी प्रा. बी. टी. देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वावर लिहिलेल्या लेखांचे ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती…’ या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. नुटा बुलेटिनच्या दीर्घ प्रवासात योगदान देणाऱ्या नानासाहेब बोके, अविनाश देशमुख आणि सूरज डिके यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. एमफुक्टोचे सरचिटणीस डॉ. आर. के. चव्हाण यांनी नव्या पिढीने नुटा बुलेटिनचे अंक वाचून शिक्षकांच्या हक्कांसाठी झालेला संघर्ष समजून घ्यावा, असे आवाहन केले. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा यांनी नुटा बुलेटिन हे केवळ माहिती देणारे माध्यम नसून, माहितीचे ज्ञानात रूपांतर करणारे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. बदलत्या उच्च शिक्षण व्यवस्थेत वाढत असलेल्या खासगीकरणाच्या प्रवाहाबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत, शिक्षकांनी पुढील पिढीच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. प्रा. असोक बर्मन यांनी शिक्षक चळवळीचा इतिहास, संघटित संघर्ष आणि प्रा. बी. टी. देशमुख यांच्या नेतृत्वाचे स्मरण केले. नव्या पिढीने हा संघर्षाचा इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन करत, पुढील काळातही नुटा बुलेटिनचा प्रवास अखंड सुरू ठेवण्यासाठी एका व्यक्तीऐवजी समूहाने नेतृत्व करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करताना नुटाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण रघुवंशी यांनी बुलेटिनच्या पाच दशकांच्या प्रवासाचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी तसेच पदवीधर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *