Headlines

शेवंती लागवड व संवर्धन कार्यशाळा:श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात यशस्वी आयोजन




श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने “शेवंती लागवड व संवर्धन” या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. अमरावती गार्डन क्लब आणि अमरावती हौशी बाग यांच्या समन्वयातून आयोजित या कार्यशाळेला विद्यार्थी, प्राध्यापक, बागकामप्रेमी आणि शेवंती उत्पादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या आयक्यूएसी समन्वयक डॉ. संगीता इंगोले होत्या. मंचावर अमरावती गार्डन क्लबचे सचिव डॉ. गजेंद्र पचलोरे, माजी अध्यक्ष डॉ. व्ही. आर. देशमुख आणि डॉ. किशोर बोबडे, अमरावती हौशी बाग संस्थेचे अध्यक्ष संजय कांडलकर, प्रमुख मार्गदर्शक संजय काळे व अविनाश भोजापुरे, तसेच वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिनेश खेडकर उपस्थित होते. डॉ. गजेंद्र पचलोरे यांनी शेवंती लागवडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. संजय कांडलकर यांनी अमरावती हौशी बागच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि शेवंती लागवडीतील आपले अनुभव उपस्थितांशी शेअर केले. त्यांनी छंदाचे रूपांतर कौशल्यात आणि कौशल्याचे रूपांतर उद्योजकतेत करता येते, असा प्रेरणादायी संदेश दिला. अध्यक्षीय मनोगतात डॉ. संगीता इंगोले यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, उद्योजकता, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि बागकामाची आवड विकसित होत असल्याचे सांगितले. तांत्रिक सत्रात वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. रेखा मग्गीरवार यांनी शेवंती लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, विविध जाती, संवर्धनाच्या पद्धती तसेच प्रदर्शनासाठी शेवंतीची योग्य तयारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाधारित सादरीकरणाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी आणि बागकामप्रेमींनी स्वतः कलम निर्मिती, लागवड, कुंडी व्यवस्थापन आणि निगा राखण्याच्या तंत्रांचा अनुभव घेतला. यामुळे “शेवंतीची भरगच्च, आकर्षक आणि प्रदर्शनक्षम कुंडी कशी घडवावी?” याचे शास्त्रीय आणि व्यावहारिक उत्तर उपस्थितांना मिळाले. शेवंती लागवडीचे तज्ज्ञ संजय काळे आणि अविनाश भोजापूरे यांनी विविध जातींची ओळख, कलमे तयार करण्याची पद्धत, कुंडीतील लागवड, छाटणी, खत व पाणी व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण आणि प्रदर्शनासाठी शेवंतीची तयारी यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करून दाखविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनेश खेडकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती पुंडकर यांनी केले, तर डॉ. प्रशांत देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि भारताचे माजी कृषिमंत्री व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना अभिवादन करून झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *