![]()
नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या दूध भेसळीच्या प्रकारावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. १९ ऑगस्ट रोजी केलेल्या तपासणीत ४,७१० लिटर भेसळयुक्त व संशयित दूध नष्ट करण्यात आले. याशिवाय पनीर, स्किम्ड मिल्क पावडर आणि क्रीमसह लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात १५ व्यक्ती आणि संबंधित डेअऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महापे येथील मे. पी. के. डेअरीवर छापा टाकला असता आयशर टँकरमधील दुधाच्या पाकिटांमध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि चिलरमधील थंड पाणी मिसळले जात असल्याचे आढळले. याप्रकरणी शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल याला रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. तपासणीत एक किलो स्किम्ड मिल्क पावडरमध्ये ८ ते १० लिटर पाणी मिसळून भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याचे समोर आले. हे दूध गाय-म्हशीचे शुद्ध दूध असल्याचे भासवून ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील विविध डेअऱ्यांना पुरवले जात असल्याचा आरोप आहे. दूध, पनीर, पावडर आणि क्रीमचा मोठा साठा जप्त पी. के. डेअरीकडे अन्न सुरक्षा परवाना नसल्याचेही तपासणीत आढळले. तेथील ७६१ लिटर दूध नष्ट करण्यात आले. तसेच १२९.५ किलो पनीर, ४७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि ८८.४ किलो क्रीम जप्त करण्यात आले. महापे येथील मे. भास्कर डेअरीतून संशयित पावडर व पनीरसह ५४८ किलो साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित परवाना निलंबित करण्यात आला आहे. रबाळे येथील मे. नारायण डेअरीतील ३,६४८ लिटर पाश्चराईज्ड स्किम्ड दूध प्रयोगशाळेचा अहवाल उपलब्ध नसल्याने नष्ट करण्यात आले. १५ जण आणि डेअऱ्यांविरोधात गुन्हा या कारवाईनंतर २२ ऑगस्ट रोजी तुर्भे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. यामध्ये शिवेंद्र जैस्वाल, प्रदीप यादव, भास्कर पिलानी यांच्यासह विविध डेअऱ्या आणि पेढ्यांचा समावेश आहे. अन्न भेसळीच्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई कोकण विभागाचे सहआयुक्त अजित मैत्रे, अन्न सुरक्षा अधिकारी विक्रम निकम, प्रशांत पवार, उत्तरेश्वर बडे आणि माणिक जाधव यांच्या पथकाने केली. नागरिकांना अन्नपदार्थात भेसळीचा संशय आल्यास १८०० २२२ ३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. हेही वाचा.. FDA ची राज्यभर धडक कारवाई: मुंबई क्रिकेट असोसिएशनसह 11 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित, 45 हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर अन्न आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ४५ हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३३ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली, तर नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ११ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. सविस्तर वाचा
Source link
नवी मुंबईत दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश:4,710 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट, लाखोंचा मुद्देमाल जप्त, 15 जणांवर गुन्हा