![]()
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, त्यांना या संकटातून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच, येत्या दसरा मेळाव्याच्या दिवशी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे अनेक ट्रक रवाना करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शिंदे यांनी केली. डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देण्यात आले आहे. यंदा पारंपरिक दांडियाऐवजी भजनसंध्या, संगीत कार्यक्रम आणि अन्य सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येत आहे. शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतीचे नुकसान, उत्पन्नातील घट आणि दैनंदिन गरजा भागवण्याचे आव्हान यामुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत संकटग्रस्त शेतकऱ्यांना केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केले. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळावा आणि त्यांना सणासुदीच्या काळात काहीसा आधार मिळावा, या उद्देशाने शिवसेनेच्या माध्यमातून मदतकार्य राबवण्यात येत आहे. येत्या दसरा मेळाव्याच्या दिवशी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे मोठ्या संख्येने ट्रक रवाना करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्यावर संकट आले असताना समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्याला आधार देणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सामाजिक संस्थांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीच्या उत्पन्नावर होत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होतो. त्यामुळे शेतकरी कुटुंबांतील महिलांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. याच उद्देशाने दुष्काळग्रस्त भागांतील महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे. शिलाई मशीनच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यातून त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतील. याशिवाय, दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबांमधील मुलींच्या विवाहासाठीही शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या उपक्रमांमागे संकटग्रस्त कुटुंबांना तात्पुरता दिलासा देण्यासोबतच त्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. नवरात्रोत्सवात भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर आयोजित शारदीय नवरात्रोत्सवात यंदा भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पारंपरिक दांडियाऐवजी भजनसंध्या आणि संगीत कार्यक्रम आयोजित करून उत्सवाला वेगळे स्वरूप देण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उत्सवस्थळी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समृद्धीचे दिवस यावेत, अशी प्रार्थना त्यांनी देवीचरणी केली. महाराष्ट्र ही संतांची आणि कष्टकऱ्यांची भूमी असून, राज्याला समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. भजन, भक्तिगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वारसा जपण्याबरोबरच पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम अशा उत्सवांतून होत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील विविध घटक एकत्र येतात, सामाजिक सलोखा वाढतो आणि आपल्या परंपरांशी असलेले नाते अधिक दृढ होते, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील भजन मंडळांच्या सादरीकरणाने भक्तिमय वातावरण नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित भजनसंध्येत कोकणातील विविध भजन मंडळांनी सहभाग घेतला. देवीची भजने, श्री गणेशाची भजने आणि पारंपरिक भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणामुळे संपूर्ण सभामंडप भक्तिरसात न्हाऊन निघाला. सुंदररीत्या उभारण्यात आलेल्या सभामंडपातील भक्तिमय वातावरणामुळे उपस्थित भाविक भारावून गेले. या उत्सवाच्या माध्यमातून कोकणातील लोककला आणि भक्तिसंगीताला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या जोडीला सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उत्सवातून निधी देण्याचा निर्णय हा याच सामाजिक बांधिलकीचा भाग मानला जात आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उपक्रमाचे एकनाथ शिंदेंकडून कौतुक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मतदारसंघातील विकासकामांसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातूनही नागरिकांशी जोडलेले आहेत. सांस्कृतिक परंपरा जपणारे आणि समाजातील गरजू घटकांना मदत करणारे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नवरात्रोत्सवाच्या आयोजनाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. उत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. एका बाजूला भक्तिसंगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम, तर दुसऱ्या बाजूला संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत, अशा स्वरूपाची सांगड या उपक्रमात घालण्यात आली आहे. चौकट : बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी गाऱ्हाणे डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी नांदावी, शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटातून दिलासा मिळावा आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस यावेत, यासाठी मालवणी भाषेत देवीचरणी गाऱ्हाणे घालण्यात आले. कोकणच्या मातीत रुजलेल्या लोकपरंपरेतून व्यक्त करण्यात आलेल्या या प्रार्थनेने उपस्थितांचे लक्ष वेधले. भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या गाऱ्हाण्यातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. त्याचबरोबर संकटात सापडलेल्या बळीराजाच्या वेदनांशी समाजाने जोडले जाण्याचा संवेदनशील संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. चौकट : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदतनिधीचे धनादेश दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुढाकार घेतला. या वेळी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांसाठी मदतनिधीचे धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार असून, त्याच्यावर संकट ओढवल्यानंतर त्याला मदत करणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. दुष्काळग्रस्त कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी विविध स्तरांतून मदतीचे हात पुढे येत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. हेही वाचा… ‘अशी राजवट गाडलीच पाहिजे’:देशाची वाट लागताना गप्प बसणार असू, तर जगण्याचा अधिकार काय? उद्धव ठाकरेंची टीका निवडणुकीच्या माध्यमातून मत व्यक्त करण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेतला जात असेल, तर सत्ताधाऱ्यांविरोधात उभे राहून सत्ता उलथवणे हाच आमचा निर्धार आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘आम्ही रेझिम चेंज करायलाच उभे आहोत, काय म्हणणं आहे तुमचं?’ असा सवाल करत त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. प्रशांत भूषण यांच्या सत्ताबदलासंदर्भातील वक्तव्यावरून भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. सविस्तर वाचा…
Source link
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत:डोंबिवलीतील नवरात्रोत्सवात उपमुख्यमंत्र्यांची घोषणा